खा. डाॅ. प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण ; भाजपच्या कार्यकर्त्यांत सर्वत्र संतापाची लाट
संजय कु-हाडेवर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल ; महिला आयोगानेही घेतली दखल
बीड : खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणारा शिक्षक संजय कु-हाडे याच्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून राज्यातील विविध ठिकाणच्या पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. कु-हाडेच्या या नीच कृत्याविरूध्द राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली असून त्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
स्त्रियांच्या सामाजिक सुरक्षा आणि सन्मानाबद्दल एकीकडे सर्वत्र चर्चा झडत असतांना दुसरीकडे ज्या प्रकरणाशी दुरान्वयेही संबंध नाही, अशा लोकप्रतिनिधींबद्दल हीन प्रकारची भाषा समाज माध्यमांमध्ये वापरून महिलांची हेटाळणी करण्याचा प्रकार भयंकर चीड आणणारा आहे. खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्या विषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करून संजय कु-हाडे याने महिलांचा अवमान करण्याबरोबरच शिक्षकी पेशाला काळीमा फासली आहे, या प्रकाराबद्दल राज्यातील तमाम भाजपा व भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक पसरला असून त्याचे तीव्र पडसाद आज ठिक ठिकाणी उमटले.
संजय कु-हाडे हा निगडी (पुणे) येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याच्या या कृत्याचा तीव्र निषेध व्यक्त करत पुणे येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी संस्थाचालकाची भेट घेवून त्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. भाजपचे अशोक मुंडे, रविंद्र खेडकर, रघुनंदन घुले, गणेश ढाकणे, दिपक नागरगोजे, अमोल नागरगोजे, बजरंग आंधळे आदींसह असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
खासदार डाॅ प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण आल्यानंतर भाजप व भाजयुमो कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक पसरला. आज राज्यात सगळीकडे या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला. पुणे, अहमदनगर, पाथर्डी, परभणी, गंगाखेड, बीड, लातूर, बुलढाणा, लोणार, परळी, अंबाजोगाई, सिरसाळा आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात जावून संजय कु-हाडे विरूध्द तक्रारी दाखल केल्या. बीड जिल्हयातील कार्यकर्त्यांनी प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात जावून त्याच्याविरूध्द तक्रारी दाखल केल्या. आयटी अॅक्ट, विनयभंग तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर पोलिसांनी दाखल केले आहेत.
महिला लोकप्रतिनिधीबाबत केलेल्या अश्लील आणि अवमानकारक वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्वाधिकारे दखल घेतली असून आठ दिवसात संजय कुऱ्हाडे याला व्यक्तीश: उपस्थित राहुन खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. फेसबुक या समाज माध्यमावर महिला लोकप्रतिनिधीबाबत कुऱ्हाडेने केलेले वक्तव्य हे महिला लोकप्रतिनिधींचा अवमान व स्त्रीची प्रतिमा मलिन करणारे आहे असे आयोगाने म्हटले आहे.