मुंबईत १० हजार घरांची निर्मिती करणार : उदय सामंत
मुंबई : मुंबईतील घर निर्मितीमध्ये येणारे अडथळे दूर करून येत्या २ वर्षात मुंबईमध्ये म्हाडा मार्फत १० हजार घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी आज दिली.
मुंबई मंडळाने २०१५ ते २०१९ या कालावधीत १० हजार ५७६ घरे बांधण्याचे उद्दिष्ठ निश्चित केले होते. मात्र केवळ २ हजार घरांचीच निर्मिती करण्यात आल्याचे म्हाडा अधिकाऱ्यांसोबत आज झालेल्या आढावा बैठकीत निष्पन्न झाले आले. त्यामुळे जास्तीत जास्त घरे निर्माण करण्यासाठी म्हाडाच्या मोकळ्या भूखंडावर झालेले अतिक्रमण हटण्याची कारवाई येत्या १५ दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली
मुंबईत परवडणाऱ्या घरांसाठी लाखो लोक अर्ज करतात मात्र म्हाडाकडून मुंबईसाठी प्रत्येक वर्षी हजार ते बाराशे घरांची निर्मिती करण्यात येते. म्हाडाकडून मोठ्या प्रमाणात मुंबईत घरे निर्माण केली जाणे आवश्यक असताना तसे होत नाही. म्हाडाने नेमलेले कंत्राटदार हे वेळेत काम पूर्ण करत नसल्याने घरांची निर्मिती वेळेत होत नाही. अशी अनेक करणे मुंबईतील घर निर्मिती अडथळे ठरत आहेत. मात्र हि कारणे दूर करून येत्या २ वर्षात म्हाडाकडून १० हजार घरे निर्माण करण्यात येतील अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांमुळे म्हाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून म्हाडाच्या घर निर्मितीत घट आली आहे.मात्र आता अशी अनधिकृत बांदकामे तात्काळ हटवण्यात येणार आहेत. लवकरच अतिक्रमण निष्कासन विभाग तयार करण्यात येणार असून त्यासाठी म्हाडात १ उपजिल्हाधिकारी,३ तहसीलदार नियुक्तीसाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.