सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे : धनंजय मुंडे

सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे : धनंजय मुंडे

मंत्री बडोले यांच्या कार्यालयातील प्रकाराची चौकशी करण्याची मागणी

मुंबई: सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयातील अधिका-याने पैसे घेऊनही काम केले नाही. त्यामुळे मंत्रालयातच या अधिका-याची धुलाई करण्यात आली आहे.

उस्मानाबादमधील अरुण निटुरे यांनी या अधिका-याला मारहाण केली आहे. आश्रम शाळेची मान्यता आणि एक आश्रमशाळा अनुदानित करण्यासाठी निटुरे यांनी पैसे दिले आहेत. परंतु पैसे घेऊनही अधिकारी काम करत नसल्यामुळे त्यांनी या अधिका-याला मारहाण केली आहे.

दरम्यान या घटनेवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारमधील मंत्र्यांची दालने भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत.लोक उघड उघड पैसे दिल्याचे सांगून मंत्र्यांच्या दालनात जाऊन जाब विचारत आहेत. भ्रष्टाचाराच्या पैशावरून मंत्र्यांच्या दालनात हाणामारी होत आहे. हे राज्य भ्रष्टाचाराच्या बाबतीत किती पुढे गेले आहे हे स्पष्ट होत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान पैसे घेऊन काम करणारा कर्मचारी व मंत्री यांचा काही संबंध आहे का ? हे पैसे कोणासाठी घेतले जात होते, ज्या आश्रमशाळेच्या मान्यतेसाठी व अनुदानासाठी पैसे घेतले त्याच प्रमाणे आतापर्यंत श्री बडोले यांच्या कार्यकाळात मान्यता दिलेल्या आश्रमशाळा आणि अनुदान हे पैसे देऊन केले का याची एसीबी मार्फत चौकशी करण्याची मागणीही मुंडे यांनी केली आहे. लाच देणे आणि घेतल्याचे निदर्शनास येणेही गुन्हा असल्याने याबाबत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी ही त्यांनी केली आहे.

Previous articleमुंबईत १० हजार घरांची निर्मिती करणार : उदय सामंत
Next articleजितेंद्र आव्हाड श्याम मानव आणि मुक्ता दाभोळकरांना “वाय प्लस” सुरक्षा द्या