मंत्र्याच्या पीएला पैसे दिल्याचा आरोप बिन बुडाचा
मंत्री राजकुमार बडोले यांचा खुलासा
मुंबई : आज एका दैनिकात “सामाजिक न्याय मंत्र्यांच्या दालनात पैशावरू हाणामारी” या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातमीचा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांनी तीव्र शब्दात निषेध केला असून सदरचे वृत्त तद्दन खोटे आहे, या बातमीत अरूण निठुरे यांनी मंत्र्याच्या पिएला पैसे दिल्याचा केलेला आरोप बिन बुडाचा आहे, त्यांची मानसिकता तपासली पाहिजे असे बडोले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
अरुण निठुरे यांची उस्मानाबाद येथील विनाअनुदानीत केंद्रीय आश्रम शाळेस मान्यता देण्याचा प्रस्ताव सन २००९ पुर्वी पासुन प्रलंबीत होता, केंद्रीय आश्रम शाळेला अनुदान केंद्र शासनाकडुन देण्यात येते. राज्यात एकुण ३२२ विनाअनुदानीत अनु.जातीच्या केंद्रीय आश्रमशाळा आहेत, त्यांना अनुदान देण्यासंदर्भात मंत्रीमंडळाच्या मान्यतेचा प्रस्तावावर मान्यतेची कार्यवाही सुरु आहे, असेही बडोले यांनी नमूद केले आहे.
निठुरे यांचा प्रस्ताव कायम स्वरुपी विनाअनुदानीत मान्यतेचा होता, त्या संदर्भात विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्रांना सुध्दा सादर करण्यात आला होता, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी वित्त विभागामार्फत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते, त्यानुसार त्यांच्या प्रस्तावावर कार्यवाही सुरु होती, वास्तविकत: त्यांनी सुरु केलेली शाळा अनुधिकृत आहे, त्यास शासनाची कुठलीही मान्यता नाही, अशा परिस्थितीत मंत्रीमंडळाची मान्यता न घेता मंत्री स्तरावरच मान्यता द्या अशा प्रकारची नियमबाह्य मागणी ते सातत्याने करित होते असेही पत्रकात नमूद केले आहे.
निठूरे यांचा सदरील प्रस्ताव मंत्री कार्यालयात एक दिवसापुर्वी आला असता तात्काळ मंजुरी द्या, प्रस्ताव माझ्या मान्यतेसाठी पाठविला असे म्हणत त्यांनी नस्ती सांभाळणाऱ्या लिपीकाला मारहाण केली, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे सांगत निठूरे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कोणीही येईल आणि फाईल मंजूर करा असा कोणी दबाव टाकत असेल तर ते शक्य नाही. शेवटी मंत्रिमंडळाचा विषय आहे, त्यात आम्ही काही करू शकत नाही. अनेक लोक वैफल्यग्रस्त असतात त्यातून अशा घटना घडतात मात्र आरोप करताना थोडा तरी विचार करायला पाहिजे असेही बडोले यांनी म्हटले आहे.
निठूरे ही व्यक्ती तशी वैफल्यग्रस्त असल्याचे दिसते. या पुर्वीसुध्दा पावसाळी अधिवेशानावेळी नागपुर येथे विधानभवनासमोर आत्मदहन करण्याची नोटीस त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात दिली होती, व तसा प्रयत्न देखील केला होता. ते काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी होते, त्यांची मनस्थीती बिघडल्याचे त्यांनी स्वत: सांगितले आहे.
त्यांनी माझ्यावर कुठलेही आरोप केले नसुन माझ्या स्वीय सहाय्यकावर केलेले आरोप हे राजकिय षड:यंत्र असुन मोघम स्वरुपाचे आहेत. या संपुर्ण प्रकरणाची मी स्वत: चौकशी करुन यावर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.