लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो : निरूपम

लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो : निरूपम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अशिक्षित, अडाणी असल्याची टीका करणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम हे आपल्या विधानावर ठाम असून यामध्ये काहीही चुकीचे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आपण लोकशाहीत राहतो आणि लोकशाहीत पंतप्रधान हा देव नसतो.मी वापरलेले शब्द असभ्य नव्हते,असे निरुपम म्हणाले.

नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना “अनपढ- गवार” संबोधले होते. त्यावर आपण आपल्या विधानावर ठाम असून, “ही लोकशाही आहे आणि पंतप्रधान काही देव नाही” तसेच आपण केलेले वक्तव्य अयोग्य नसल्याचा दावा देखील निरूपम यांनी केला आहे. तसेच दिल्ली विद्यापीठाने त्यांना पदवी का बहाल केली नाही, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ”हि लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कोणताच पंतप्रधान हा देव नसतो” जर शालेय मुलांनी पंतप्रधानांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणार ? असा टोला निरुपम यांनी लगावला.

महाराष्ट्रातील शाळेत पंतप्रधानांच्या आयुष्यावर एक लघुचित्रपट दाखवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर निषेध करताना निरूपम म्हणाले,हा लघुपट जबरदस्तीने दाखवण्याचा निर्णय चुकीचा आहे. मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे, विद्यार्थी एका अशिक्षित माणसाची चित्रफिती बघून काय शिकणार आहे.निरुपम यांच्या वक्तव्याचा समाचार भाजपाच्या प्रवक्त्या शायना एन.सी. यांनी घेतला आहे. ” एक मानसिक विकृत” असा टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळांना पुढील आठवड्यात नरेंद्र मोदींवर लघुपट दाखवण्यास सांगण्यात आले आहे. याबद्दल, शासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चलो जीते है” हा पंतप्रधान मोदींवर आधारित असलेली चित्रफित, विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आणि “सामाजिक संदेश’ देणारी असल्याकारणामुळे, या लघुचित्रपटाचा प्रयोग जिल्हा परिषदेच्या शाळांना १८ सप्टेंबरपासून दाखवण्याची सूचना करण्यात आली आहे.

Previous articleपंकजाताई मुंडे यांच्या राॅयलस्टोन निवासस्थानी गणरायाचे थाटात आगमन
Next articleभाजपाध्यक्ष अमित शहा लालबागच्या राजाच्या दर्शनाला !