शरद पवारांच्या उपस्थितीत १ ऑक्टोबर रोजी बीडला राष्ट्रवादीचा विजय संकल्प मेळावा
धनंजय मुंडे
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत येत्या १ ऑक्टोबरला बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य विजय संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणा-या या मेळाव्याची माहिती देण्यासाठी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
बीड जिल्हा हा शरद पवार आणि पुरोगामी विचारांना मानणारा आहे, म्हणूनच या जिल्ह्याने यापूर्वी ६ पैकी ५ जागांवर विजय मिळवला होता या इतिहासाची पुनरावृत्तीच नव्हे तर लोकसभेसह जिल्ह्यातील सहाही जागा जिंकण्याचा संकल्प करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
ही सभा न भूतो न भविष्यती आणि विक्रमी व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील हे ही उपस्थित राहणार आहे.या सभेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आणि राज्यातील प्रश्न मांडण्यात येणार आहेत. आज जिल्ह्यात पाऊस नाही, शेतकर्यांची पिके पाऊसा अभावी गेली आहेत. या पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. व्यापारी संप सुरू असल्याने शेतकर्यांना मुग, उडीद हे कुठे विक्री करावे असा प्रश्न पडला आहे. खरेदी केंद्र नाहीत, बोंडअळीची नुकसान भरपाई मिळत नाही, पिक मिळत नाही, यामुळे महागाई प्रचंड वाढली आहे. सर्वसामान्य माणुस त्रस्त झाला आहे. पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किंमती दररोज वाढत आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असा अंतिम इशारा देण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे मुंडे यांनी सांगितले.