“त्या” वक्तव्याबद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली दिलगिरी

“त्या” वक्तव्याबद्दल रामदास आठवलेंनी व्यक्त केली दिलगिरी

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत, याने काहीही फरक पडत नाही. माझ्या वाहनांमध्ये पेट्रोल आणि डिझेल सरकारकडून भरले जाते. माझे मंत्रिपद गेल्यानंतर कदाचित मला महागाईची झळ बसू शकेल”, असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केल्यानंतर त्याचे पडसाद उमटताच त्यांनी दिलगिरी व्यक्त करीत पेट्रोल डिझेल दरवाढ प्रश्नावर जनतेच्या भावना दुखाविण्याचा हेतू नव्हता असा खुलासा केला आहे.

काल जयपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत इंधन दरवाढ प्रश्नावर उत्तर देताना केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटताच आठवले यांनी अधिकृत खुलासा करून दिलगिरी व्यक्त केली आहे. इंधन दरवाढीचा रिपब्लिकन पक्षाने विरोध केला आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या व्यथा आपल्याला चांगली माहीत असून जनभावनेचा  नेहमीच आदर राखला आहे.आपण सामान्य जनतेतूनच अडीअडचणींचा सामना करूनच पुढे आलो आहोत. त्यामुळे सामान्य जनतेचे नेमके प्रश्न आपल्याला चांगले माहीत आहेत आणि आपण त्या खस्ता खाल्ल्या आहेत. त्या व्यथा अनुभवल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या भावनांबद्दल आपण कधीही असंवेदनशील राहू शकत नाही. जनतेच्या भावना दुखाविणारे मत आपण कधीही मांडले नाही असे आठवले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

इंधन दरवाढीबाबत उपस्थित करण्यात आलेला प्रश्न हा माझ्या व्यक्तिगत स्तरावर विचारला होता. मात्र इंधन दरवाढीबाबत जनतेला होत असलेल्या त्रासाबद्दल जेथे जेथे थेट विचारले जाते तेथे माझे उत्तर हे इंधन दरवाढ रद्द करावे असेच असते. तसेच सामान्य जनतेची जी मागणी असते तीच मागणी रिपब्लिकन पक्ष करीत आला असून, आपण ही सदैव सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आलेलो आहोत असे स्पष्टीकरण आठवले यांनी आज केले. इंधन दरवाढ हा गंभीर विषय आहे. याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना इंधन दरवाढ कमी करण्याबाबत सूचना केल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाने हे इंधन दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. इंधन दरवाढ प्रश्नांवर मी केलेले वक्तव्य कुणाच्या भावना दुखविणारे ठरले असल्यास त्याबाबत मी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Previous articleशाळा व शिक्षकांना भिकारी म्हणणा-या जावडेकरांनी माफी मागावी: खा. अशोक चव्हाण
Next articleआंबेडकर ओवेसी एकत्र येणे म्हणजे कुणाला ‘चारायचे’ कुणाला ‘पाडायचे !