आंबेडकर ओवेसी एकत्र येणे म्हणजे कुणाला ‘चारायचे’ कुणाला ‘पाडायचे !
उध्दव ठाकरेंची टीका
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसींनी एकत्र येऊन नविन डबके तयार केले असून दलित आणि मुसलमानांनी ही डबकी उधळून लावली पाहिजेत,येत्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून प्रकाश आंबेडकरांकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोलाही लगावण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांना दलित- मुस्लिम ऐक्याचे सूत्र मांडत आगामी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असा प्रस्ताव एमआयएमने दिला आहे. या दोन्ही पक्षाच्या एकत्रित येण्यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. दलितांनी दलित म्हणून डबक्यात राहावे आणि मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. यापूर्वी पडद्यामागून भाजपाच्या सोयीचे राजकारण करणारे आंबेडकर व असदुद्दीन ओवेसी हे आता ते २०१९ मधील निवडणुकीत उघडपणे भाजपाला मदत करतील. ओवेसी- आंबेडकर यांनी एकत्र येणे हे राजकारणासाठी शुभसंकेत नाहीत, असेही अग्रलेखात म्हटले आहे.