श्रीमंत आमदारांमध्ये राज्यातील चार आमदारांचा समावेश
मुंबई : देशातील ३ हजार १४५ आमदारांमध्ये सर्वात जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील ४ आमदारांनी स्थान मिळवले आहे.भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुस-या क्रमांकावर आहेत.
देशातील सर्वाधिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, एकूण ३ हजार १४५ आमदारांमध्ये सर्वाधिक वार्षिक उत्पन्न असलेल्या पहिल्या २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील ४ आमदारांचा समावेश आहे. भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुस-या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ३४.६६ कोटी आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे या यादीत विसाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ४.५६ कोटी आहे. बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न ९.८५ कोटी आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रशांत ठाकूर हे या यादीत १७ व्या क्रमांकावर असून,यांचे वार्षिक उत्पन्न- ५.६१ कोटी रूपये आहे. तर सर्वात कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आमदारांच्या यादीत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे २० व्या म्हणजे शेवटच्या स्थानी आहेत.त्यांचे वार्षिक उत्पन्न ९.०९ लाख आहे.
महाराष्ट्रातील एकूण २५६ आमदारांचे वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये आहे.२०१३ ते २०१७ दरम्यान झालेल्या निवडणुकांमध्ये देशातील ४ हजार ८६ आमदारांपैकी ३ हजार १४५ आमदारांनी वार्षिक उत्पन्न निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. त्यानुसार असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) हा अहवाल तयार केला आहे.