जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यासह विविध पदे एमपीएससीच्या कक्षेतून वगळली
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाच्या महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विशेषज्ज्ञ संवर्गातील १७ विविध पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून वगळण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी ही पदे स्वतंत्र निवड मंडळाद्वारे भरण्यात येणार आहेत.
राज्यात प्रभावी आरोग्य सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडून प्राधान्य देण्यात येत आहे. याअंतर्गतच वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ मधील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यासह वेतनश्रेणी १५६००-३९१०० ग्रेड पे ६६०० मधील विविध १७ पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून तीन वर्षासाठी वगळण्यात आली आहेत. तीन वर्षानंतर ही पदे पूर्ववत आयोगाच्या कार्यकक्षेत समाविष्ट करण्यात येणार आहेत. या पदांच्या निवडीसाठी स्वतंत्र निवड मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ज्या पदांच्या भरती प्रक्रिया सुरु असतील ती पदे वगळून उर्वरित पदे नवीन मंडळामार्फत भरण्यात येणार आहेत.