आंबेडकरांचा काँग्रेसला होकार पण राष्ट्रवादीला नकार !
मुंबई : एमआयएम सोबत युती करण्याचा निर्णय घेतलेले भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे कौतूक करत राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.भिडेंची पिलावळ राष्ट्रवादीमध्ये सक्रीय असल्याने त्यांच्या सोबत कदापी जाणार नसल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
आगामी निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात आज काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाच्या नेत्यांची चर्चा झाली. यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे आणि अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते.या बैठकीत विविध विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा झाली.राष्ट्रवादीने सुरूवातीला भाजपला पाठिंबा दिल्याने त्यांच्या सोबत जाणे आम्हाला अडचण असली तरी काँग्रेसशी आघाडी करण्यास आंबेडकर यांनी सहमती दर्शवली.
त्यानंतर झालेल्या एका पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी संघ परिवार, मोहन भागवत आणि राष्ट्रवादीवर टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही असा टोला लगावत, राष्ट्रवादीत भिडेंची पिलावळ सक्रीय असल्याने आम्ही राष्ट्रवादीसोबत युती करु शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.गेल्या विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना भाजपला पाठिंबा देण्यास तयार नसताना राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे त्याच्या सोबत जाणे अडचणीचे ठरू शकते असे आंबेडकर म्हणाले. आम्ही काँग्रेस सोबत आघाडी करण्यास तयार आहोत,पण त्यांच्या मित्र पक्षासोबत जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणूक एमआयएमसोबत युती करूनच लढवणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.