भाजपला मदत करणा-यांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये
शरद पवारांचा प्रकाश आंबेडकरांना टोला
मुंबई : भाजपच्या उमेदवाराला मदत करणा-यांनी धर्मनिरपेक्षता शिकवू नये असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना लगावला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे धर्मनिरपेक्ष आहेत, पण त्यांचा पक्ष धर्मनिरपेक्ष नाही अशी टीका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती.त्यांच्या या टीकेला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार प्रत्युत्तर दिले आहे. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या दोन निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता असे सांगून या निवडणूकीच्या प्रचाराला मी गेलो नव्हतो तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला तेव्हा त्यांना धर्मनिरपेक्षता आठवली नाही असा टोलाही शरद पवारांनी लगावला.वरळीतील नेहरू सेंटर येथिल चित्र प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
एका निवडणूकीत ईशान्य मुंबईतील आमच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाने त्यावेळी नीलम गोऱ्हे यांना निवडणूक रिंगणात उतरविले होते.त्यांच्या या उमेदवारीचा फायदा भाजपचे उमेदवार प्रमोद महाजन यांना झाला होता. अशी आठवण सांगत, भाजपला फायदा व्हावा यासाठी उमेदवार उभे करण्याची कामगिरी करणारे आज धर्मनिरपेक्ष कोण आहेत आणि कोण नाही हे सांगतात”, असा हल्लाबोलही पवार यांनी यावेळी केला.