शिक्षकांना वाहिनीवरुन देण्यात येणारे प्रशिक्षण मराठी भाषेतच
प्रशिक्षण पूर्णपणे विनाशुल्क – शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे
मुंबई : राज्यामध्ये या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली व आठवीची पाठ्यपुस्तके पुनर्रचित करण्यात आली आहेत. सदर पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातील शिक्षकांना डिजीटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागाने आयोजित केला आहे. हे प्रशिक्षण गुजरात सरकाराच्या वंदे गुजरात या चॅनेलमार्फत देण्यात येणार आहे, असे स्पष्ट करतानाच विनोद तावडे यांनी सांगितले की, गुजरात सरकारकडे स्वत:ची १६ शैक्षणिक चॅनेल आणि वाहिन्या सुरु असून, या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षकांना विनामूल्य प्रशिक्षण देण्याची सुविधा गुजरात सरकारने दर्शविली, त्यानुसार गुजरात सरकारच्या “वंदे गुजरात “ या शैक्षणिक वाहिनीच्या माध्यमातून शिक्षकांना विनाशुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले.
मराठी शिक्षकांना गुजराती वाहिनीवरुन प्रशिक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी केलेल्या टिकेला प्रत्युत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, विरोधकांचे आरोप हे चुकीच्या माहितीच्या आधारे असून, यासंदर्भात वस्तुस्थितीची माहिती घेतली असती तर असे बिनबुडाचे आरोप विरोधकांनी केले नसते. शिक्षकांच्या या डिजीटल प्रशिक्षणाबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे यांनी सांगितले की, राज्यातील शिक्षकांना पाठ्यपुस्तकांबाबत प्रशिक्षण देण्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपणासाठी सरकारला पैसे मोजावे लागले असते, परंतु गुजरात सरकारच्या स्वत:च्या १६ वाहिन्यांच्या माध्यमातून हे प्रक्षेपण विनाशुल्क दुरदर्शन, डिटीएच यावर उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली. राज्यातील बहुतांश शिक्षकांपर्यंत सदर माध्यमाद्वारे एकाचवेळी पोहोचता येईल, या उद्देशाने सदर प्रशिक्षण हे शैक्षणिक वाहिनीद्वारे प्रक्षेपित करून देण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेल्या उपकरणांचा खर्चही राज्य सरकारला द्यावा लागणार नाही. जर गुजरात सरकार अशा प्रकारचे डिजीटल प्रशिक्षण विनाशुल्क उपलब्ध करुन देत असेल तर या प्रशिक्षणावर राज्य सरकारकडून होणाऱ्या खर्चामध्ये नक्कीच बचत झाली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.
गुजरातची ही वाहिनी जीओ, डिटीएच, व्होडाफोन, एअरटेल या सर्व ॲपवर उपलब्ध होणार आहे. असे स्पष्ट करतानाच गुजरात सरकारने दिलेली सेवा ही विनाशुल्क असून, आम्ही शिक्षकांच्या डिजीटलच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तानच्या चॅनेलचा वापर केलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत तावडे यांनी आश्चर्य व्यक्त केले.
विरोधी पक्षाने थोड तांत्रिक ज्ञान घेतले असते तर चांगले झाले असते. कारण यापूर्वीही विरोधी पक्ष नेत्यांना राज्यपालांचे भाषण गुजरातीमध्ये ऐकायला आले होते. त्यामुळे विरोधकांना नेहमीच संताजी आणि धनाजी दिसतात, विरोधकांचे हे घृणास्पद राजकारण आहे, असा टोलाही तावडे यांनी मारला.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून महाविद्यालयीन विद्यापीठांना पत्र देऊन सर्जीकल स्ट्राइक हा दिवस २९ सप्टेंबर २०१६ रोजी साजरा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोग यांनी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्याचे पालन देशभरातील विद्यापीठे आणि महाविद्यालये यांच्याकडून होणार आहे. सर्जीकल स्ट्राइक मध्ये सैनिकांनी जी विजयी कामगिरी केली ती कामगिरी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे, हा नक्कीच चांगला उपक्रम आहे, असेही तावडे यांनी सांगितले.