कुठे आहेत ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि महामंडळ ?
धनंजय मुंडे
परळी : पुण्याच्या हिंजवडी परिसरातील ऊसतोड कामगाराच्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना अतिशय संतापजनक असून, राज्यात कायदा व सुव्यवस्थाच शिल्लक नाही. साध्या शाळेत जाणार्या मुलींनाही हे सरकार सुरक्षा देऊ शकत नाही, अशी संतप्त प्रतिक्रीया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व्यक्त केली. सरकारने जाहीर केलेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीच्या शाळा आणि ऊसतोड कामगार महामंडळ कोठे आहे ? असा संतप्त सवालही त्यांनी विचारला आहे.
पुण्याच्या हिंजवडी परिसरात बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या एका ऊसतोड कामगाराच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. सदर घटनेमुळे समाजात संतप्त प्रतिक्रीया उमटल्या आहेत. या संदर्भात मुंडे यांनी आज पिडीत मुलीच्या पालकाशी दुरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांना धीर देताना तुम्हाला न्याय मिळवुन देईल असे सांगितले.
सदर घटना ही अतिशय संताप जनक असून, या घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पिडीत कुटुंबियाला सर्वोतपरी मदत करावी, अशी मागणी करतानाच ऊसतोड कामगारांचे प्रश्न, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी, समस्या तसेच राज्यातील ढासाळलेली कायदा व सुव्यवस्था याबाबत आपण सरकारला आगामी अधिवेशनात जाब विचारणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.