नाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करा : भुजबळ

नाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करा : भुजबळ

नाशिक : नाशिक जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणी आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून खरीप हंगाम शेतकऱ्याच्या हातातून गेल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात टंचाई उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्या अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

याबाबत छगन भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात  म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यातील येवला,नांदगाव,निफाड,मालेगांव,बागलाण,कळवण,देवळा, चांदवड, सिन्नर, पूर्व दिंडोरी,पूर्व नाशिक सह बहुतांश भागात माहे जुलैपासून पाऊस नाही. जूनमध्ये थोडा फार पाऊस झाला त्यामुळे काही भागात पेरणी झाली. खरीपाच्या पिकांना जुलै-ऑगस्ट या काळात पाण्याची खूप गरज असते. मात्र पाऊस नसल्यामुळे खरीपचा हंगाम वाया गेला आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असून बहुतांश गावांमध्ये टँकर सुरू आहेत. पाऊस नसल्याने टँकरची मागणी सतत वाढत आहे. जनावरांचा चारा व जनावरांच्या पाण्याची सुद्धा मोठी समस्या निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगाम तर हातातून गेलाच आहे. मात्र काही दिवसांत पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामाच्याही आशा मावळणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अशा परिस्थितीत रोहित्र नादुरुस्त झाल्यास थकबाकी भरून घेऊन मगच रोहित्र बसवून देण्याचे महावितरणकडून आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे रोहित्र फेल झाल्यानंतर थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना पैसे भरण्याची सक्ती केली जात आहे. थकबाकी भरली तरच नादुरुस्त रोहित्र दुरुस्त करून बसून दिले जात आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना थकबाकी भरणे शक्य नाही. त्यामुळे विजेची थकबाकी भरण्याची सक्ती न करता जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थिती लक्षात घेता नाशिक जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करण्यात याव्यात अशी मागणी  भुजबळ यांनी मुख्यमंत्री  फडणवीस यांच्याकडे केली आहे.

Previous articleव्यापाऱ्यांना प्लॅस्टिक वापरास मुदतवाढ नाही
Next articleमराठवाड्यात दुष्काळ जाहिर करून तातडीने उपाययोजना करा – धनंजय मुंडे