मुख्यमंत्र्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीला जाहीर चर्चेचे आव्हान
मुंबई : विकासकामांच्या बाबतीत राज्यातील भाजपा सरकारने मोठे काम केले असून, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारचा पंधरा वर्षांचा कालावधी आणि भाजपा सरकारची चार वर्षे याची सार्वजनिक मंचावर जाहीर तुलना करू, असे थेट आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. इच्छाशक्ती असते तेंव्हा काय घडते, हे या चर्चेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला दिसेल, असेही त्यांनी ठणकावले.
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीचा समारोप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने स्वच्छता, घरे, गॅस कनेक्शन, वीज, आरोग्य अशा क्षेत्रात काम करून सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडविले आहे. आयुष्मान भारत योजना ही सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यासाठीची जगातील सर्वात मोठी योजना आहे. त्याचप्रमाणे राज्यातील भाजपा सरकारनेही प्रत्येक क्षेत्रात भरीव काम केले आहे. विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर विरोधकांना या सरकारवर टीका करता येत नसल्यामुळे त्यांनी भ्रम निर्माण करून विकासाच्या मुद्द्यावरून भलतीकडे चर्चा नेण्याचा प्रयत्न चालविला आहे. विकासाच्या मुद्द्यावरून भाजपा युती सरकार आणि काँग्रेस आघाडी सरकारच्या कामाची तुलना करणारी चर्चा करण्याचे आपले त्यांना आव्हान आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, राफेल विमानांच्या खरेदीत कोणीही मध्यस्थ नव्हता त्यामुळे काँग्रेसला दलालीचा आरोप करता येत नाही. मूळ विमानांच्या किंमतीची तुलना केली तर काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील खरेदीच्या दरापेक्षा नऊ टक्के कमी दराने भाजपा आघाडी सरकार ही विमाने खरेदी करत आहे. या विमानांवर लावण्यात येणाऱ्या विविध शस्त्रास्त्रांसहीत किमतीचा विचार केला तर भाजपा सरकारने काँग्रेसच्या तुलनेत ही विमाने वीस टक्के कमी दराने मिळवली आहेत. तरीही काँग्रेस पक्ष खोटेनाटे आरोप करत आहे. या लढाऊ विमानाची सर्व माहिती उघड व्हावी, अशी काँग्रेसची मागणी आहे पण तसे केले तर त्याचा फायदा शत्रू राष्ट्रांना होईल.
ते म्हणाले की, भाजपा सरकारच्या यशस्वी कामगिरीमुळे विरोधी पक्ष हताश आणि निराश झाले असून ते खोट्या गोष्टी रेटून सांगत आहेत. देशाला भ्रमित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत सत्य परिस्थिती पोहचवावी.
शेतीविषयक प्रस्ताव महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. पिकांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे ठरावात आभार मानण्यात आले. आ. अनिल बोंडे यांनी ठरावाला अनुमोदन दिले.संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस पक्षातर्फे करण्यात येणारे आरोप व वस्तुस्थिती स्पष्ट केली. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वस्तुस्थिती समजून घेऊन काँग्रेसचे आरोप खोडून काढावेत, असे आवाहन त्यांनी केले.