राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार राम लक्ष्मण यांना घोषित
मुंबई : राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना आज येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज या पुरस्काराची घोषणा केली.
प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ रामलक्ष्मण यांच्या नावाची शिफारस केली. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
यापूर्वी हे पुरस्कारश्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर,ज्योत्सना भोळे,आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर,मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर,सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग, पुष्पा पागधरे यांना प्रदान करण्यात आला आहे
पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी नागपूर येथे झाला, त्यांना प्राथमिक संगीताच्या शिक्षणाचे धडे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवीले आणि उर्वरित शास्त्रीय संगीताचे शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था, नागपूर येथून पूर्ण केले. आपल्या करियरचे केंद्रबिंदू मुंबई रहावे यासाठी त्यांनी मुंबई मध्ये “अमर विजय” या नावाने ऑर्केस्ट्राची सुरुवात केली अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली आणि त्यांनी १९७४ साली “पांडू हवालदार” या मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक म्हणून त्यांची निवड केली येथूनच त्यांच्या पुढील प्रवासास सुरुवात झाली. “पांडू हवालदार”, “तुमचं आमचं जमलं”, “राम राम गंगाराम”, “बोट लाविल तेथे गुदगुदल्या”, “आली अंगावर”, “आपली माणसं”, “हिच खरी दौलत”, “दीड शहाणे”, “लेक चालली सासरला”, “देवता” या सर्व दादा कोंडके यांच्या मराठी चित्रपटांसाठी राम लक्ष्मण यांनी संगीत दिले. तसेच त्यांनी “एजंट विनोद”, “तराणा”, “हम से बडकर कौन”, “मैने प्यार किया”, “हम आप के है कोन”, “हम साथ साथ है”, “१०० डेज”, “अनमोल”, “पोलिस पब्लिक”, “सातवा आसमान”,“पत्थर के फुल” या हिंदी चित्रपटांना त्यांनी बहारदार संगीत दिले. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी चित्रपट सृष्टीला १५० हून अधिक चित्रपटांना संगीत देऊन आपले बहुमूल्य योगदान दिले आहे.