राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले मुनाफ हकीम काँग्रेसच्या वाटेवर ?
मुंबई : राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले व महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मुनाफ हकीम काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते.लवकरच ते काॅग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेवून काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा करणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू घेतल्याने काल राष्ट्रवादीचे संस्थापक तारिक अन्वर यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. मुनाफ हकीम यांनीही त्याच कारणाने राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. राफेलच्या घोटाळा प्रकरणी देशाचे लक्ष वेधले असतांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पुर्णतः अडचणीत आल्यावर त्यांची तळी उचलणे योग्य नाही. त्यामुळे राष्ट्रवादीची भूमिका संभ्रमात टाकणारी आहे. या कारणामुळे मुनाफ हकीम यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
मुनाफ हकीम हे मूळचे काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते. काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या परदेशी मुद्द्यांवरून त्यांनी शरद पवार यांच्या पाठी ठाम उभे राहून राष्ट्रवादी पक्षात पक्ष वाढीसाठी काम केले . मितभाषी आणि अजातशत्रू म्हणून मुनाफ हाकीम यांना राजकीय क्षेत्रात ओळखले जाते. राष्ट्रवादीत राहूनही त्यांच्यावर आजतागायत कोणते आरोप झाले नाहीत, हे विशेष.
मुनाफ हकीम यांच्या कुटुंबीयांचे स्वातंत्र्य लढ्यात मोठे योगदान आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाशी त्यांचे संबंध कायमचे राहिले. राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करतील, असे बोलले जात असले तरी काँग्रेसचे काही नेते मुनाफ हकीम यांच्या संपर्कात आहेत. सोनिया गांधी यांच्या जवळचे काँग्रेसचे एक मोठे नेते लवकरच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी मुनाफ हकीम यांच्या काँग्रेस प्रवेशाबद्दल चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.