महाआघाडीत मनसेच्या समावेशासाठी राष्ट्रवादी आग्रही; काँग्रेसचा विरोध
मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधकांनी महाआघाडीची मोट बांधण्यास सुरूवात केली असतानाच पंतप्रधान आणि भाजपवर टीका करणारे राज ठाकरे यांच्या मनसेचा समावेश महाआघाडीमध्ये करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. पण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी याला विरोध केला आहे.
गेल्या दोन आठवड्यापासून विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी विरोधकांची मोट बांधण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहे. राष्ट्रवादीसह,स्वाभिमानी शेतकरी संघटना,प्रकाश आंबेडकर, कपिल पाटील, यांच्याशी महाआघाडीसाठी काॅग्रेसने पुढाकार घेत चर्चेला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेला महाआघाडीमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला आहे.परंतु या प्रस्तावावर काँग्रेसने कोणताच निर्णय घेतलेला नाही. मात्र मनसेच्या समावेशासाठी राष्ट्रवादीचे नेते आग्रही आहेत.
मनसेला राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर काॅग्रेसचा विरोध आहे. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नसून, मनसे कायद्याचे पालन करत नाही केवळ हिंसेचे राजकारण करतात. गेल्या निवडणूकीत मनसेने नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता.तसाच पाठिंबा आताही द्यायला हवा, असे मुंबई काॅग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सांगून,मनसे महाआघाडीचा भाग होवूच शकत नाही असे स्पष्ट केले.