संभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या! : विखे पाटील 

संभाजी भिडेंना थेट भारतरत्न किंवा महाराष्ट्र भूषणच द्या! : विखे पाटील 

मुंबई : संभाजी भिडेंवर सरकारचा विशेष स्नेह वारंवार दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरील फक्त गुन्हे मागे घेण्याऐवजी त्यांना थेट महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा, अशी उपरोधिक टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना विखे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, संभाजी भिडे यांच्याविरूद्धचे काही गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय धक्कादायक आहे. या निर्णयामुळे संभाजी भिडे यांना सरकारचे पाठबळ असल्याचा विरोधी पक्षांचा आरोप खरा ठरला आहे.

संभाजी भिडे यांना मुळात संविधानाप्रती आदर नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीपासून प्रेरणा घेऊन संविधान लिहिले, असा त्यांचा दावा आहे. त्यांच्या लेखी ज्ञानोबा माऊली आणि संत तुकारामांपेक्षा मनू मोठा होता. आंबे खाऊन मूल होण्यासंदर्भात नाशिकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात समन्स बजावल्यानंतरही संभाजी भिडे न्यायालयात उपस्थित रहात नाही. त्यासाठी समन्स पोहोचलेच नसल्याची सबब सांगितली जाते. पण् असे समन्स निघाल्याचे वर्तमानपत्रांनी ठळकपणे प्रकाशित झाल्यानंतरही संभाजी भिडे त्याची दखल घेत नाही. न्यायालयात उपस्थित राहून कायद्याप्रती आदर दाखवू शकत नाही. अशा व्यक्तीवरील गुन्हे मागे घेऊन सरकार नेमका काय संदेश देते आहे? अशी संतप्त विचारणाही विरोधी पक्षनेत्यांनी केली.

भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. सरकार त्यांना यातून वाचवू पाहत असल्याचा आरोप आम्ही वारंवार करीत असून,त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याच्या निर्णयातून आमच्या आरोपाला पुष्टी मिळाली असल्याचे विखे पाटील पुढे म्हणाले.

 

Previous articleराष्ट्रवादीच्या नेत्यांनी बीडचा विकास बारामती सारखा का केला नाही :पंकजा मुंडे 
Next articleराफेल प्रकरणी मोदी सरकार दोषीच; चौकशी करा समर्थन कधीच नाही