ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे, दुर्बिन लावून शोध घेतोय : मुंडे
बीडच्या विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडेंची तुफान टोलेबाजी
बीड : ज्या स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी भाजपाला सत्तेवर बसवण्याचे काम केले त्यांच्या नावाने चार वर्षांपूर्वी जाहिर केलेले ऊसतोड कामगार महामंडळ कुठे आहे ? मी परळीमध्ये त्याचे मुख्यालय दुर्बिन लावून शोधत असतो असे म्हणत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री आणि सरकारची पुन्हा एकदा गोची केली.
बीड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खा.श्री.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित विजयी संकल्प सभेत धनंजय मुंडे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान टोलेबाजी करीत भाषण करून सभा जिंकून घेतली.विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये शतकासाठी जशी शर्यत असते तसे भावाचे शतक कोणाचे आधी पूर्ण होते यावरून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची शर्यत सुरु असल्याचा टोला विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला.
ऊसतोड कामगारांच्या जिल्ह्यात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढण्याची घोषणा करून फसवणुक करण्यात आली. जिल्ह्याला कर्जमाफी मिळाली नाही, बोंडअळीचे नुकसान मिळाले नाही, पिक विम्याची रक्कम शेतकर्यांच्या खात्यावर वर्ग झाली तरी त्याचे व्याज मात्र जिल्हा बँकेचे चेअरमन खात असल्याचा घनाघात त्यांनी केला.
जिल्ह्याला मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, शेतकर्याला शेतात काही नाही, घरात काही नाही आणि सरकार फक्त घोषणा देण्याचे काम करत आहे. देशाच्या चौकीदारानेच १२५ कोटी जनतेला फसवले, आरक्षणाच्या नावावर मराठा, मुस्लिम, धनगर, लिंगायत समाजाला फसवले असल्याचे ते म्हणाले. आजच्या सभेने मागच्या सर्व सभांचे रेकॉर्ड ब्रेक झाले असून जिल्ह्यातील लोकसभेसह विधानसभेच्या सहाही जागा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.