लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळ दस-यापूर्वी कार्यान्वित होणार
पंकजा मुंडे
मजूरांचे नेतेपद मंत्री पदापेक्षाही मोठे ; मागण्यांसाठी दोन दिवसांत मुंबईत बैठक
पाथर्डी : ऊसतोड मजुरांच्या मागण्या दसऱ्याच्या आधी मान्य करून घेण्यासाठी दोन दिवसांनी मुंबईत बैठक घेणार आहे. सध्या कोयता बंद आंदोलन तर सुरूच आहेच. वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरून आपल्या मागण्या मान्य करू घेवू पण तशी वेळ मी तुमच्यावर येऊ देणार नाही, त्या अगोदरच मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान,मेळाव्यास राज्यभरातून लाखोंच्या संख्येने जमलेल्या ऊसतोड मजूरांनी लेकीच्या पाठिशी आपली ताकद उभी केल्याचे चित्र दिसून आले.
तालुक्यातील खरवंडी कासार येथे पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या ऊसतोड कामगारांचा भव्य मेळाव्यात त्या बोलत होत्या. ऊसतोड मजूरांसमोर पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुमचे आणि माझे नाते निःस्वार्थी आहे, त्यात कोणताच सौदा नाही.कोणते काँट्रॅक्ट नाही. तुमची आणि माझी नाळ ही परिश्रम आणि प्रेमाने जोडली गेली आहे. लोकनेते मुंडे
साहेब हे ऊसतोड मजुरांचे, दिन दुबळ्यांचे नेते होते.त्यांच्या न्याय हक्कासाठी ते अविरत लढले, सत्ता आली, ते कारखानदार झाले तरी देखील त्यांनी आपल्याशी असलेली नाळ तुटू दिली नाही. साहेब गेले त्यावेळी सर्व संपल्याची भावना निर्माण झाली होती.पण, तुमच्या असंख्य डोळ्यांत आलेल्या अश्रूमध्ये एकात प्रेम आणि दुस-या डोळ्यात अंगार दिसला आणि म्हणूनच तुमच्या प्रेम आणि अंगाराची शक्ती याच्या जोरावर साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
ऊसतोड मजूरांचा मुद्दा राजकारणाचा विषय नाही, तो आमच्या हक्काचा आणि पोटाचा विषय आहे. यात कोणी राजकारण करत असेल तर मुळीच खपवून घेणार नाही असे सांगून मुंडे साहेबांना तुम्ही जे प्रेम व आशीर्वाद दिला त्या जोरावर ते चालत राहिले.यासाठीच त्यांच्या पश्चात त्यांच्या विचारावर चालणे हे माझे कर्तव्य आहे. मी साहेबांना शब्द दिला आहे तळ हाताच्या फोडा प्रमाणे तुम्ही या ऊसतोड मजुरांना जपले आहे त्यांना मी कधीही एकटं सोडणार नाही. तुमचे नेतेपद हे मला मंत्री पदापेक्षाही मोठे वाटते.
महामंडळ दस-यापूर्वी
मुंडे साहेबांनी मला स्वाभिमान दिला आहे. त्यांच्या नावाने सुरू होणारे महामंडळ दसऱ्याच्या आधी कार्यान्वित होणार आहे.
या महामंडळाच्या माध्यमातून पुढील दहा वर्षात माझ्या ऊसतोड मजुरांच्या हातातील कोयता जाण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीच्या हातात डिग्री देण्यासाठी याचा मोठा फायदा होणार आहे.
हेलिकॉप्टर रिकामे पाठवून साधला मनमोकळा संवाद
मेळाव्यासाठी पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने खरवंडीत आल्या होत्या. परंतु ऊसतोड मजूरांशी मनमोकळा संवाद साधता यावा म्हणून त्यांनी हेलिकॉप्टर रिकामे पाठवून दिले.दिवसभरातील व्यस्त कार्यक्रमामुळे मेळाव्यास यायला उशीर झाला, तरी देखील लाखोंच्या संख्येने लोक उभे होते. हेलिकॉप्टरच काय तुमच्या साठी यमालाही परत पाठवण्याची माझी तयारी आहे. जर तो आला तर मी त्याला सांगेल माझ्या ऊसतोड मजुरांचे काम होऊ दे मग मी तुझ्या सोबत येते असे म्हणताच लोकांना गहिवरून आले. कार्यक्रमाचे संचलन संजय किर्तने यांनी केले. मेळाव्यास राज्यभरातून ऊसतोड मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.