मुख्यमंत्र्यांना पहिला धक्का.. आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा

मुख्यमंत्र्यांना पहिला धक्का.. आशिष देशमुखांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई : वेगळ्या विदर्भासाठी लढा देणारे आणि याच मुद्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर उघड उघड नाराजी व्यक्त करणारे काटोलचे भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी अखेर आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.त्यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना पाठवला आहे.

काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ईमेल आणि फॅक्सद्वारे पाठविला. उद्या  बुधवारी विधानसभा अध्यक्ष  हरिभाऊ बागडे यांना प्रत्यक्ष  भेटून ते त्यांना राजीनामा पत्र सुपूर्त करतील.आ. देशमुख यांनी वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री फडणवीस यांना अनेकदा अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भाजपवर उघड उघड नाराजी व्यक्त करणा-या देशमुखांनी मुख्यमंत्री आणि भाजपाच्या धोरणांवर टीका केली आहे. आपण गेली वर्षभर शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज उठवत असून, कोकणातील नाणार प्रकल्प विदर्भात आणावा अशी मागणी करीत आहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्याचे देशमुख यांनी सांगितले. नाराज असलेल्या देशमुखांनी आज  भाजप सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. गांधी जयंतीचे औचित्य साधून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असून, आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी सेवाग्रामच्या दौऱ्यावर आहेत.त्याच्या उपस्थितीत ते काँग्रेस प्रवेशाचा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे.

Previous articleकापडापासून सूत…..राज ठाकरेंचा मोदी शहांवर निशाणा
Next articleअहिंसेच्या दिवशी भाजप सरकारचा हिंसक चेहरा समोर आला :नवाब मलिक