राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही

राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही

बीड : राष्ट्रवादीच्या एकाही स्थानिक नेत्याची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नाही, अशी घणाघाती टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.शरद पवारांनी अगोदर पक्ष एकसंध कसा राहिल बघावे नंतर आम्हाला टक्कर द्यावी असे थेट आव्हान त्यांनी राष्ट्रवादीला दिले.

बीड येथे काल राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन केले होते.त्यावेळी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ऊसतोड कामगार महामंडळावरून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. तर आज धारूर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा समाचार घेत विजय संकल्प मेळाव्याची खिल्ली उडविली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अगोदर आपल्या पक्षातली वाद थांबवून पक्ष एकजुट एकसंध कसा राहिल हे बघावे त्यानंतरच आम्हाला टक्कर द्यावी असे म्हणत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मुंडेंच्या मुलीला शह देण्यासाठी प्रत्यक्षात पवारांना या ठिकाणी यावे लागले हेच आमचे यश आहे.असे सांगत, त्यांच्या नेत्यांमध्ये एकीच नाही ते आम्हाला काय टक्कर देणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव करण्यासाठी एका निवडणूकीत त्यावेळेचे अख्ख मंत्रिमंडळ बीडमध्ये तळ ठोकून होते. पण निकाल काय लागला, मुंडे लाखो मतांच्या मताधिक्याने निवडून आले. अशीच येत्या निवडणूकीत राहिल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

Previous article….आणि राहुल गांधी सोनिया गांधींनी ताट धुतले !
Next articleअजित पवारांचा मुलगा पार्थ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरणार ?