जनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला;निवडणुकीत परिणाम भोगावे लागणार
आशिष देशमुख
मुंबई : केंद्रातील आणि राज्यातील भाजपचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले असून, जनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला असल्याने त्याचे परिमाण येत्या निवडणुकीत भाजपाला भोगावे लागतील असा इशारा आशिष देशमुख यांनी दिला. त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला.
भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा आज अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजप, राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली.विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या इतर भागातील दुष्काळजन्य जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंधित पालकमंत्र्यांनी कोणतीही उपाय योजना आखल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोंडअळी, हरभरा, तूर इत्यादी पिकांची नुकसान भरपाई सरकारने अजूनपर्यंत दिली नाही. स्वामिनाथन आयोग लागू झाला नाही. मेक इन इंडिया, मॅग्नेटीक महाराष्ट्र, स्कील इंडिया, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजनांचे फलित कुठेही दिसत नाही. विदर्भातील एकाही एमआयडीसीमध्ये एक सुद्धा नवीन उद्योग आला नाही अशी टीका देशमुख यांनी केली.
मिहानमध्ये नवीन गुंतवणूक आलेली नाही. त्यामुळे रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वस्तु व सेवा कर आणि नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होऊन हजारो युवकांचा रोजगार गेला आहे. केवळ घोषणा करण्यात आल्या प्रत्यक्षात रोजगार निर्मितीत सरकार फेल ठरले आहे. पेट्रोल, डीझेल, गॅसच्या भरमसाठ दरवाढीमुळे महागाई जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. जीडीपी कमी-कमी होत असून त्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. राफेलसारखा मोठा भ्रष्टाचारपण झाला आहे. विविध जाती व धर्मांमध्ये जी तेढ निर्माण झाली आहे ती दूर करण्यात सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. मतांचे राजकारण करून आपला हेतु साध्य करायचा, अशा प्रकारचे वातावरण आज सर्वत्र दिसत आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये अस्थिरतेची भावना निर्माण झाली आहे. शिक्षणात मराठा, धनगर व मुस्लीम समाजासाठी ५ टक्के आरक्षण लागू न केल्यामुळे त्यांच्यात भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे अशा शब्दात देशमुख यांनी भाजपचा समाचार घेतला.
बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दलितांच्या समस्या, अल्पसंख्यांकांच्या समस्या, उद्योगधंदे अशा अनेक समस्यांवर समाधान करण्यात भाजपा सरकार अपयशी ठरली आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न सातत्याने सरकारसमोर मांडले. परंतु सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे जनता नाराज आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असून सुद्धा जनतेसाठी काहीच करू शकत नसेल तर आमदारकीचा राजीनामा देणे मी उचित समजतो. महात्मा गांधींच्या विचारसरणीवर व मार्गावर चालण्याची माझी तयारी आहे. जनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला असून त्याचे परिमाण येत्या निवडणुकीत भाजपाला भोगावे लागतील. शेतकरी, बेरोजगारी, उद्योगधंदे अशा अनेक समस्या काल आपण राहुल गांधी यांच्या कानावर टाकल्या आहेत. राहूल गांधी यांच्याकडून युवकांना फार मोठ्या अपेक्षा आहेत. २०१३ मध्ये स्वतंत्र विदर्भासाठी बेमुदत उपोषणाला बसलो असतांना नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांनी भाजपा सत्तेत आल्यास विदर्भ राज्य निर्माण करू, असे आश्वासन देऊन उपोषण संपविले होते. परंतु, हे आश्वासन न पाळल्यामुळे किंबहुना विदर्भाच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विदर्भाची जनता नाराज असल्याचे असे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली. आमदारकीचा राजीनामा आपण गांधी जयंतीच्या दिवशी दिला. आता पक्षाचा राजीनामा सुद्धा आपण नवरात्रासारख्या चांगल्या पर्वावर देऊ असेही त्यांनी सांगितले.