राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण ? उद्धव ठाकरे

राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण ? उद्धव ठाकरे

मुंबई : एक वेळ राज्य गहाण ठेवू पण डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला पैसे कमी पडू देणार नाही असे वक्तव्य आरपीआयच्या वर्धापन दिनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.त्यांच्या या वक्तव्याचा समाचार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून घेतला आहे.

स्मारकांसाठी पैसे नाहीत, राज्य गहाण ठेवू म्हणणारे तुम्ही कोण असा सवाल करीत राज्याचा सातबारा या महापुरूषांच्या नावावर आहे. मुख्यमंत्री येतात आणि जातात. परंतु राज्य हे कायम राहते. त्यामुळे स्मारकासाठी राज्य गहाण टाकण्याची भाषा करणे अयोग्य असून, ‘याअतिउत्साही’ वक्तव्यांमुळे सरकारची, राज्याची ‘इभ्रत गहाण’ ठेवण्याची वेळ येऊ शकते. मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून समाचार घेतला आहे.

काय आहे अग्रलेखात…

हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेच आहे. आजच्या महाराष्ट्राला प्रतिष्ठा या चार स्तंभांमुळेच मिळाली आहे. त्यामुळे आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची वेळ येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे लक्षात घेतले पाहिजे. रामदास आठवले यांच्या ठाण्यातील सभेत मुख्यमंत्री जोरात, पण अतिउत्साहाने बोलले. ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल,’’ असे एक टाळीचे वाक्य मुख्यमंत्र्यांनी या सभेत केले. डॉ. आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्या राज्यकर्त्यांवर काठीच उगारली असती. या निमित्ताने राज्यकर्त्यांनी कबुली दिली आहे की, राज्य आर्थिकदृष्टय़ा डबघाईला आले आहे व कर्ज काढून सण-उत्सव साजरे केले जात आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार होतील की नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्नचिन्ह उभे करताच राज्यकर्त्यांची तारांबळ उडाली होती. अर्थात सरकारच्या तिजोरीत ठणठणाट असला तरी ज्याप्रकारे घोषणांचा पाऊस पडतो आहे तो थक्क करणारा आहे. या परिस्थितीतून मार्ग काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचे समुद्रातील स्मारक व इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभे करायचे आहे. पैशांअभावी ही स्मारके रखडणार असतील तर ते राज्याला शोभादायक नाही. इतक्या उंचीची खर्चिक स्मारके कशाला, हा प्रश्न विचारला जात आहे. मुळात या उंचीची माणसे पुन्हा निर्माण होणार नाहीत. म्हणून पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारके उभारायलाच हवीत. त्यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी
राज्य गहाण ठेवू असे मुख्यमंत्री जाहीर सभांतून बोलतात, हे बरे नाही. मुळात राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय, डॉ. आंबेडकरांच्या नावावर आहे. त्यांचे राज्य तुम्ही गहाण कसे टाकणार? मुख्यमंत्री येतात व जातात. सरकारे बदलत असतात, पण राज्य कायम राहते. त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कुणी करीत असेल तर ते योग्य नाही. डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी वाटल्यास बुलेट ट्रेनचे महागडे प्रकल्प रद्द करू, समृद्धी महामार्गावरील उधळपट्टी थांबवू, असे सांगितले असते तर ते व्यवहारी ठरले असते.

Previous article….तर राम कदमांचा राजीनामा घेतला असता : सुप्रिया सुळे
Next articleपेट्रोलनंतर डिझेल चार रुपयांनी स्वस्त होणार !