एमपीएससीच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

एमपीएससीच्या ‘त्या’ उमेदवारांना न्याय देण्यासाठी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

मुंबई : परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे अडचणीत आलेल्या अभियंत्यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असे आश्वासन यावेळी त्यांनी उमेदवारांना दिले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झाल्यानंतर देखील राज्यातील ८३३ पदवीधर अभियंत्यांवर नोकरी जाण्याची वेळ आली आहे. परिवहन विभागाच्या वतीने सहायक मोटर वाहन निरीक्षक पदासाठी झालेली भरती उच्च न्यायालयाने रद्द केल्यामुळे हे अभियंते अडचणीत आले आहे.या प्रकरणी न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेले उमेदवारांनी आज कृष्णकुंज निवासस्थानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून आपली व्यथा मांडली.

सहायक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी पूर्वी केंद्र सरकारचे निकष लागू होते.जड मोटर वाहन चालविण्याची परवाना आणि सरकारी गँरेंज मधील कामाचा अनुभव असे निकष ठरविले होते.मात्र हे निकष २०१६ मध्ये बदलण्यात आले.या दोन्ही अटी राज्य सरकारने बदलून नवे निकष लावले.त्या आधारे जाहिरात देऊन भरती प्रक्रिया राबविली गेली.मात्र असे नियम बदलविण्यास कोर्टात आक्षेप घेतला गेला.पूर्वीच्या निकषांमुळे शासनाला आवश्यक त्या संख्येने उमेदवार मिळत नव्हते.तसेच खोटी प्रमाणपत्रे आणण्याचे प्रकार उघडकीस आले होते.ते थांबविण्यासाठी शासनाने नियमामध्ये बदल केला होता.असे बदल करण्याची गरज का भासली हे शासना तर्फे कोर्टात योग्य प्रकारे मांडले गेले नाही.त्यामुळे केवळ याचिका कर्त्याची बाजूच न्यायालयापुढे आली.राज्य सरकारने उत्तम वकील न देता कनिष्ठ वकीलावर ही जबाबदारी सोपवली.या सगळ्या प्रकारामुळे न्यायालयाचा निर्णय शासना विरोधात गेला असल्याचे या उमेदवारांचे म्हणणे आहे.

राज्य सरकारने केलेल्या दुर्लक्षामुळे ८३३ उमेदवारांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.या सर्व अडचणीतून मार्ग निघावा व न्याय मिळावा यासाठी या सर्व उमेदवारांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या उमेदवारांचे सर्व म्हणणे राज ठाकरेंनी ऐकून या नोकर भरतीच्या निर्णय प्रक्रियेसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे असे आश्वासन त्यांनी या उमेदवारांना दिले.

Previous articleपेट्रोलनंतर डिझेल चार रुपयांनी स्वस्त होणार !
Next articleमंत्रालयात महसूल नगरविकास गृह खात्याच्या तक्रारींचा पाऊस