साता-यातून उदयनराजे भोसलेंच्या ऐवजी रामराजे निंबाळकरांना उमेदवारी द्या !

साता-यातून उदयनराजे भोसलेंच्या ऐवजी रामराजे निंबाळकरांना उमेदवारी द्या !

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काॅग्रेसची उमेदवार चाचपणीसाठी आढावा बैठक  सुरु असून, सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांच्या ऐवजी रामराजे नाईक निंबाळकरांना उमेदवारी द्यावी अशी मागणी एका गटाने केली आहे.

आज दुपारी एकच्या सुमारास सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार होता. मात्र राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीच्या नविन कार्यालयाचा पत्ता माहीती नसल्याने त्यांचा वेळ कार्यालय शोधण्यातच गेला अखेर त्यांनी कार्यालयात संपर्क साधला असता त्यांना फोनवरून कार्यालयाचा मार्ग सांगण्यात आला.पण खासदार भोसले पोहचेपर्यंत साता-याची आढावा बैठक संपली होती.या बैठकीत खा.उदयनराजे भोसले यांच्या ऐवजी रामराजे नाईक निंबाळकरांना उमेदवारी द्यावी अशी मागणी एका गटाने केली.बैठक संपल्यानंतर कार्यालयात पोहचलेल्या खा उदयनराजे भोसले यांनी आपण साता-यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

अध्यक्ष शरद पवार साता-याबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. उमेदवारी देताना विरोध करणाऱ्यांची ताकद किती हे पण पाहिले पाहिजे. अन्यथा विरोध झाला तरीही आपली जिंकून येण्याची ताकद असल्याचा इशारा खा.भोसले यांनी दिला. गेल्या निवडणूकीचे मताधिक्य पाहिले तर सर्वात जास्त मत मला मिळाली होती. तेवढी मते मिळवणारा उमेदवार असेल तर त्याला संधी द्या, असेही उदयनराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Previous article‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ :  विखे पाटील 
Next articleराज्यात अभुतपुर्व दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री  गप्प का ?