उमेदवार चाचपणीनंतर भविष्यकाळात योग्य निर्णय घेणार : जयंत पाटील

उमेदवार चाचपणीनंतर भविष्यकाळात योग्य निर्णय घेणार : जयंत पाटील

 राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन दिवस आढावा बैठका

 मुंबई : आगामी लोकसभा निवडणूका महाराष्ट्रात समविचारी पक्षांशी आघाडी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जिथे शक्ती आहे त्या ठिकाणची जागा लढवण्यासाठी जी परिस्थिती आहे त्याचा आढावा दोन दिवसाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत संबंधित मतदारसंघाच्या उमेदवारांच्याबाबतीत चाचपणी करण्यात आली आणि त्यावर भविष्यकाळात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली.

 गेले दोन दिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ निहाय पक्षाचा आढावा घेतला. आज या आढावा बैठका संपल्यानंतर प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना वरील माहिती दिली.

 ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे अशा सर्व लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत चर्चा केली. अनेक ठिकाणी उमेदवारांच्याबाबतीत सूचना देण्यात आल्या. त्या मतदारसंघाच्या परिस्थितीबाबत साधकबाधक चर्चाही करण्यात आली तसेच काल आणि आज महाराष्ट्रातील नेते, कार्यकर्ते याठिकाणी बोलावण्यात आले होते. यामध्ये जी चर्चा झाली त्यावर अंतिम निर्णय पक्ष भविष्यकाळात घेईल अशी माहितीही  पाटील यांनी दिली.

 आम्ही कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या नाही याविषयापेक्षा ज्या मतदारसंघात आमची शक्ती आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघापासून ते यवतमाळ मतदारसंघापर्यंत ज्याठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शक्ती आहे तिथल्या कार्यकर्त्यांना बोलावून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे यथायोग्य मतदारसंघात पक्षाने निवडणूक लढवावी की नाही या निर्णय होईल असेही पाटील म्हणाले.

 मुंबईतील जागेसंदर्भातही बैठक झाली त्यामध्ये एका जागेऐवजी आणखी एक जागा मागा अशा सूचना कार्यकर्त्यांनी केलेल्या आहेत. पुणे शहरातील कार्यकर्त्यांनाही बोलावण्यात आले होते. शेवटी शक्यशक्यतेचा विचार करुन सर्वजण निवडणूकीमध्ये शिवसेना-भाजपचा पराभव करण्याचे उद्दिष्ट ठेवून या मतदारसंघातील सगळयांशी चर्चा करण्यात आली. कुठल्या जागा मागणार किंवा देणार हा प्रश्न आज उपस्थित झाला नाही. आम्ही काँग्रेसबरोबर चर्चा करणार असून आज आम्ही जो आढावा घेतला त्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाशी चर्चा करणार आहोत असेही पाटील यांनी सांगितले.

 मनसेच्याबाबतीत या बैठकीत कोणतीही चर्चा केलेली नाही. आपल्या माध्यमातूनच या बातम्या पुढे आल्या आहेत. समविचारी पक्षांमध्ये जे पक्ष बसतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. त्या चर्चा सुरु आहेत आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रात सर्व पक्षांना घेवून एक सक्षम असा पर्याय आम्ही महाराष्ट्रात लोकसभेला देवू असेही  पाटील यांनी स्पष्ट केले.

कुठलाही फॉर्मुला नाही. निवडून येणे हाच एकमेव त्याला पर्याय आहे. निवडणूक लढत असताना काँग्रेस पक्षाशी मित्रपक्षांशी बोलणे झाले आहे. काँग्रेस पक्षाशी बोलू त्यावेळी या चर्चांचा उहापोह करण्यात येईल. आवश्यक त्या सगळया चर्चा काँग्रेस पक्षाबरोबर चालल्या आहेत. काँग्रेस पक्षात आमच्यामध्ये कोणतंही अंतर नाही. आमचे दोन्हींचे विचार योग्य दिशेने चालू आहेत अशीही माहिती पाटील यांनी दिली.

 दोन दिवस चाललेल्या या आढावा बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे, आमदार राजेश टोपे, आमदार हसन मुश्रीफ, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार जयदत्त क्षीरसागर, ऑल इंडिया अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर विद्रोही, ज्येष्ठ नेते कमलकिशोर कदम,पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी नेते उपस्थित होते.

Previous articleराज्यात अभुतपुर्व दुष्काळी परिस्थिती असताना मुख्यमंत्री  गप्प का ?
Next articleशेतकरी, आदिवासी, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे सरकारला काही देणे घेणे नाही: चव्हाण