महाआरोग्य शिबीरातून महाराष्ट्र शंभर टक्के सुदृढ होईल हे ‘ अटल ‘ सत्य: पंकजाताई मुंडे

महाआरोग्य शिबीरातून महाराष्ट्र शंभर टक्के सुदृढ होईल हे ‘ अटल ‘ सत्य: पंकजाताई मुंडे

लातूर : राज्यातील सर्व सामान्य, गोरगरीब रूग्णांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्हयात सुरू केलेल्या महा आरोग्य शिबीराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे, शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्र शंभर टक्के सुदृढ होईल असा विश्वास व्यक्त करत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भौतिक विकासाबरोबरच सामाजिक संतुलन साधण्यासाठी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण, पोषण व आरोग्य मिळाले पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

शहरातील एमआयडीसी परिसरातील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या अटल महा आरोग्य शिबीराचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मोठ्या थाटात झाला, त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड, आ. सुरेश धस, आ. विनायक पाटील, आ. सुधाकर भालेराव, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, रमेशआप्पा कराड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, आर्थिक परिस्थिती आणि सुविधांचा अभाव यामुळे अनेक गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. गरिबी हटाव चा नारा मी लहानपणापासून ऐकतेय परंतु इतक्या वर्षात गरिबी कांही हटली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गरिबांसाठी ख-या अर्थाने काम करायला सुरवात केली. मोफत आरोग्य सुविधा, आयुष्मान भारत, बेघरांना घरकुलं, जनधन योजना आदी महत्वाच्या त्यांनी राबविल्या. गरिबी हटवायची असेल तर भौतिक विकासाबरोबरच सामाजिक संतुलन राखणे महत्वाचे आहे. आम्ही रस्ते, पाणी, उद्योग, सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या पण एवढ्यावर भागणार नाही. शिक्षण, पोषण व आरोग्य प्रत्येक घटकांपर्यत पोहोचल्याशिवाय सर्व स्तराचा विकास होणार नाही. पंतप्रधान, मुख्यमंत्री व आम्ही एका समर्पणाच्या भावनेतून काम करत असल्याने यात आम्हाला निश्चित यश मिळेल.

लातूरचे प्रेमाचे नाते दोन पिढ्या पासून

मुख्यमंत्र्यांचे लातूरवर विशेष प्रेम असून मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधीचा सर्वाधिक लाभ लातूर जिल्हयाला मिळाला असल्याचे कांही वक्त्यांनी भाषणात सांगितले याचा धागा पकडून ना पंकजाताई मुंडे यांनी सहायता निधीचा प्रमुख बीड जिल्हयाचा असल्याने मुख्यमंत्र्यांचे बीड जिल्हयावरही तितकेच प्रेम असल्याचे नमूद केले. लोकनेते मुंडे साहेब देखील याच लातूरच्या रेणापूरचे कित्येक वर्षे आमदार होते त्यामुळे हे प्रेमाचे नाते दोन पिढ्या पासूनचे असल्याचे त्या म्हणाल्या. मी लातूरची पालकमंत्री असताना इथल्या लोकांना दुष्काळी परिस्थितीत रेल्वेने पाणी दिले असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळावर व्यक्त केली चिंता

अत्यल्प पाऊस झाल्याने मराठवाड्यातील सर्वच जिल्हयात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे याबद्दल पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त केली. राज्य एकीकडे विकासाची तहान भागविण्याचे काम करत असताना दुसरीकडे दुष्काळाचा सामना करण्यासाठी तितकेच समर्थपणे काम करावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.

Previous articleपुढचा मुख्यमंत्री मीच असेल : देवेंद्र फडणवीस
Next articleचर्मकार कल्याण आयोगाच्या अध्यक्षपदी वाय. सी. पवार