उदयनराजे भोसलेंनी आरपीआयकडून लोकसभा लढवावी
केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस ची उमेदवारी उदयनराजे भोसले यांना मिळणार की नाही याबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी सातारा लोकसभा मतदारसंघातुन उदयनराजे भोसले यांनी स्वीकारावी अशी ऑफर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिली.
गेल्या लोकसभा निवडणूकिमध्ये भाजप शिवसेना रिपाइं महायुतीची सातारा जागा ही रिपब्लिकन पक्षाकडे होती.त्यामुळे रिपाइंच्या कोट्यातील ही जागा उदयनराजे भोसलेंना देण्याची आपली ऑफर असल्याचे आठवले म्हणाले. उदयनराजे भोसले हे शिवछत्रपतींचे वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असणारे उदयनराजे भोसले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवल्यास रिपब्लिकन पक्षाची एकजातीय प्रतिमा बदलण्यास मोठी मदत होईल. राज्यात रिपाइं मधून दलित मराठा एकजुटीचा संदेश जाईल.असेही आठवले म्हणाले.
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी निवडणुकांच्या तोंडावर मराठी माणसांचा अवमान करणारी घेतलेली भूमिका काँग्रेसला पराभवाच्या गर्तेत ढकलणारी ठरणार आहे. उत्तर भरतीयांनी मुंबई च्या विकासात मोठा सहभाग घेतला आहे हे खरे असले तरी मुंबईच्या विकासासाठी मराठी माणसांचेच सर्वात अधिक योगदान राहिले आहे. उत्तर भारतीयांची बाजू घेताना त्यांनी मराठी माणसांचा अवमान करू नये तसेच मराठी आणि उत्तर भारतीय असा वाद करू नये असे आवाहन आठवलेंनी केले आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे इंदूमिलस्थळी उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे वेगवान पद्धतीने सुरू असून आगामी ६ डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला . आज आठवले यांनी दादर पश्चिम येथील इंदूमिल मध्ये भेट देऊन सुरू असलेल्या भिमस्मारकाच्या कामाची पाहणी केली. या स्मारकात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ३५० फुटांचा उभारण्यात येणार आहे मात्र त्यातील ९० फूट चौथऱ्याची उंची आणि प्रत्यक्ष पुतळ्याची उंची २६० फूट आहे यावर काही लोकांनी हरकत घेतली आहे.,त्यामुळे पुतळ्याची उंची ४०० फुटांपर्यंत वाढविण्याची सूचना आठवले यांनी केली आहे. या स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही उत्कृष्ठ पद्धतीने वेगवान काम करून महामानवाचे स्मारक येत्या २६ महिन्यांत पूर्ण करण्यात येईल आशी ग्वाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी आठवलेंना यावेळी दिली.