सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही – अजित पवार

सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत संविधान बचाव आंदोलन थांबणार नाही – अजित पवार

औरंगाबाद : या सरकारचा संविधानाला विरोध आहे.धर्मनिरपेक्ष शब्दाला विरोध आहे… धर्मनिरपेक्ष शब्द टोचतो का ?७० वर्ष हा वाद झाला नाही मग आत्ताच का ? जी मनुस्मृती सर्व जातीतील लोकांना नीच मानते,भेदभाव करते अशा मनुस्मृतीला जपण्याचे काम भाजप करत आहे म्हणून संविधान वाचवण्यासाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन सुरु केले आहे आणि हे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही असा इशारा विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला दिला.

 औरंगाबादमध्ये संविधान बचाव देश बचाव मोहिमेच्या आंदोलनामध्ये मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांनी सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडले. संभाजी भिडे संतांपेक्षा मनु श्रेष्ठ आहे असे सांगत आहेत. असं म्हणण्याचं धाडस होतं तरी कसं ? भेदभाव जपणाऱ्या मनुस्मृतीला जपण्यासाठी पुढाकार का घेतला जात आहे असा प्रश्न उपस्थित करत संविधान बचाव देश बचाव ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होवून बसली असून संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.

 अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये अनेक विषयांना हात घातला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. मात्र ही मागणी सरकार मान्य करत नाही. दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळायला हवी अशी मागणीही केली.

 मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाही, मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत असा संतप्त सवालही अजित पवार  केला.

 मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना पवार साहेबांच्या वाढदिवशी १२-१२-१२ रोजी राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले. मात्र आत्ताचे सरकार तसं करताना दिसत नाही. यांना कोळसा आणता येत नाही का ?हे काय झोपा काढण्यासाठी आहेत का? असे अनेक सवाल अजित पवार यांनी केले.

 मराठवाडा हे नारीशक्तीचे शक्तीपीठ आहे. मात्र इथेच महिलांवर जास्त अन्याय अत्याचार होत आहे. प्रत्येक दिवशी महिल़ाची हत्या, महिलांवरील अत्याचार अशा बातम्या वाचायला मिळतात. सरकारने ठोस निर्णय घ्यायला पाहिजे. जेणेकरून कुणालाही महिलेकडे डोळे वर करून पाहण्याची हिम्मत करता येणार नाही. कायदा कडक करायला हवा त्यासाठी आम्ही सरकारला सहकार्य करू असे आश्वासन अजितदादांनी सरकारला दिले.

 भाजपचे पदाधिकारी असलेले मधु चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. राम कदम यांनी मुलींना उचलून आणण्याची भाषा केली. राम कदम यांनी एकाही मुलीला हात लावावा… होत्याचं नव्हते करेन असा सज्जड दम भरतानाच सत्तेची नशा चढली आहे का ? फुले शाहू आंबेडकरांच्या राज्यात अशी भाषा कोणी वापरली नव्हती. आपण जागृत झाले पाहिजे असे आवाहनही अजित पवार केले.

 मराठवाडा स्वतंत्र करण्यासाठी जसा लढा उभारला गेला होता तसा लढा उभारण्याची सध्याच्या घडीला गरज आहे. ज्यांना काहीच कळत नाही अशा लोकांच्या हातात कारभार आहे. सरकारतर्फे लोकांना फसवण्याचे काम केले जात आहे. सरकारवर पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज झालं आहे. यांना कारभार सांभाळता येत नाही म्हणून यांना बाजूला करणे गरजेचे आहे असेही अजित पवार म्हणाले.

Previous articleउदयनराजे भोसलेंनी घेतली मुख्यमंत्र्यांसह भाजपा मंत्र्यांची भेट !
Next articleसावधान: आता प्लास्टिक आढळल्यास दुकानाचा परवाना रद्द होणार