मंत्रिमंडळ विस्तार : ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद देण्याची मागणी  

मंत्रिमंडळ विस्तार : ग्रामीण भागातल्या आमदारांना मंत्रिपद देण्याची मागणी  

सूत्रांची माहिती

मुंबई : संभाव्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर भाजपसह शिवसेनेच्या आमदारांमध्ये  लॅाबिंगला जोरदार सुरूवात झाली असून,या विस्तारात ग्रामिण भागातील आमदारांना संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केल्याचे समजते. या मागणीसाठी ग्रामीण भागातले आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

येत्या शनिवारी किंवा दस-यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना वेग आला असतानाच आता भाजप आणि शिवसेना आमदारांमध्ये जोरदार लॅाबिंगला सुरूवात झाली आहे. विस्तार झाल्यास भाजप त्यांच्या कोट्यातील चार जागा भरल्या जातील तर शिवसेनेचा 12 मंत्र्यांचा कोटा या आधीच पूर्ण झाला आहे. शिवसेनेच्या कोट्यातून आधीच्या मंत्रिमंडळात विधानपरिषदेतील आमदारांना संधी दिल्याने ग्रामिण भागातील आमदारांना मंत्रिपदापासून वंचित राहावे लागले आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील आमदारांना विस्तारात संधी द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी केली असल्याची माहिती समजते.  या मागणीसाठी ग्रामीण भागातले आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपद मिळालेले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या चेह-याला संधी देण्यात येईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची घोषणा केलेल्या शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी या विस्तारात शिवसेनेला अधिकचे एक कॅबिनेट मंत्री आणि राज्यमंत्रीपद भाजपकडून दिले जाईल असेही सूत्रांनी सांगितले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोट्यातील काही मंत्र्यांनी डच्चू देण्यात येवून नव्या चेह-यांनी संधी देण्याची शक्यता आहे.भाजपकडून मुंबईसह ग्रामिण भागाला यामध्ये सामावून घेतले जावू शकते. मुंबईतून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची कॅबिेनेट मंत्रीपदी संधी दिली जावू शकते परंतु मंत्रीपदी केवळ आठ ते नऊ महिन्याचाच कालावधी मिळत असल्याने आ.शेलार मंत्रीपदासाठी फारसे अनुकूल नाहीत असे समजते. संभाव्य विस्तारात भाजपकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा समावेश होणार का याबाबत उत्सुकता आहे.तर एकनाथ खडसे यांची मंत्रिमंडळात परतण्याची अजिबात इच्छा नसल्याचे सूत्रांनी सांगितले.विस्ताराबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची लवकरच भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

Previous articleतनुश्री प्रकरणी नाना पाटेकर यांना महिला आयोगाने बजावली नोटीस
Next articleभारनियमनाविरोधात राष्ट्रवादीचे कंदील आंदोलन