दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शनासाठी पंकजा मुंडेंचे समर्थक सरसावले

दसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शनासाठी पंकजा मुंडेंचे समर्थक सरसावले

बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात येत्या १८ तारखेला संत भगवानबाबा यांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगाव (ता. पाटोदा) येथे होणारा दुसरा दसरा मेळावा आहे. दसरा मेळाव्यातच संत भगवानबाबांच्या स्मारकाच्या लोकार्पणाची घोषणा ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी त्यांच्या समर्थकांकडून सुरु आहे. आगामी लोकसभा निवडणुक तोंडावर असल्याने गर्दीसाठी सर्वतोपरी ताकद लावली जाण्याचा अंदाज आहे.

संत भगवानबाबांची कर्मभूमी असलेल्या श्रीक्षेत्र भगवानगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यात अनेक वर्षे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे भाषण होई. ऊसतोडणी मजूर असलेल्या समाज मेळाव्यात मुंडे आपल्या भाषणातून समाजाला दिशा देण्याचे काम ते करत. या निमित्ताने त्यांच्या मागे असलेली समाज आणि ऊसतोड मजूरांची ताकद दिसून येई. मात्र, त्यांच्या पश्चात इथे दसरा मेळाव्यात राजकीय भाषण नाही, असा पवित्रा गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी घेतला. या भूमिकेचे पडसाद उमटून वादंग आणि आरोप – प्रत्यारोपही झाले. मात्र, भगवानगडावर मेळावा झालाच नाही. तीन वर्षांपूर्वी गडाच्या पायथ्याशी मेळावा घेतला गेला. तर, गेल्या वर्षी पंकजा मुंडे यांनी संत भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगावला मेळावा घेतला. त्या मेळाव्यात त्यांनी संत भगवानबाबांचे स्मारक उभारण्याची घोषणाही केली होती.

सध्या स्मारकाचे काम वेगात असून मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. पाण्यात बसून ज्ञानेश्वरी वाचत असलेल्या संत भगवानबाबांची पंचवीस फुट उंचीची मुर्ती या स्मारकस्थळी आहे. याच मेळाव्यात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने राज्य शासनाने राज्य जाहीर घोषणा केलेल्या महामंडळाचीही घोषणा शक्य आहे. दरम्यान, मेळाव्याच्या दृष्टीने विविध संत महंतांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच, दूरवरुन येणाऱ्यांच्या अल्पोपहार आणि चहापानाची जागोजाग सोय असणार आहे. विविध धार्मिक क्षेत्रावरुन मातीकलश आणले जाणार असून त्याचे पुजन या ठिकाणी होणार आहे.

दरम्यान, यंदा ऊसतोड मजुरांचा संप अद्यापही सुरुच असल्याने मेळाव्याला गर्दी होणार हे निश्चित आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पेजचा कव्हर फोटोही या मेळाव्याचेच बॅनर असून आपला दसरा आपली परंपरा भक्ती आणि शक्तीचा संगम असा मजकूर लिहून चलो सावरगाव अशी साद घातली आहे. त्यांनी मागच्या वर्षीच्या मेळाव्याच्या गर्दीचे फोटो आणि त्यासंदर्भातील बातम्यांची कात्रणेही आपल्या फेसबुक पेजला पोस्ट केली आहे. त्यांचे समर्थकही सोशल मिडीयावरुन मेळाव्याच्या आयोजनाचा जोरदार प्रचार करत आहेत.

Previous articleमहाराष्ट्राच्या वाट्याचा कोळसा तीन राज्यांना दिल्यानेच वीजटंचाई
Next articleभाजपचे राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान