भाजपचे राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान

भाजपचे राष्ट्रवादीला खुल्या चर्चेचे आव्हान

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेले आरोप निराधार असून राज्यातील ऊर्जा खात्याच्या कामगिरीबद्दल आणि वीजपुरवठ्याच्या स्थितीविषयी आपण नवाब मलिक किंवा त्यांच्या पक्षाच्या माजी ऊर्जामंत्र्यांशी खुल्या चर्चेला तयार आहोत, असे आव्हान भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी दिले.भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत विश्वास पाठक बोलत होते. यावेळी प्रदेश माध्यमविभाग प्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले की, राज्यात ऑक्टोबर हीटमुळे विजेची मागणी विक्रमी वाढली आहे. महावितरणने विविध उपाय केल्यामुळे सध्या केवळ 500 मेगावॅटचा तुटवडा आहे. त्यामुळे काही भागात तीन ते चार तास लोडशेडिंग करावे लागत आहे. तथापि, कोळशाचा पुरवठा वाढत असून विजेचा तुटवडा भरून निघेल व लवकरच लोडशेडिंग बंद होईल.

त्यांनी सांगितले की, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्यात ऊर्जाखात्याने विक्रमी विजपुरवठा करणे, साडेचार लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे, सौभाग्य योजनेत सुमारे साडेसहा लाख घरांना विजपुरवठा करणे, वीजनिर्मितीची क्षमता ३३०० मेगावॅटने वाढविणे, वीजखरेदीचा प्रतियुनिट खर्च कमालीचा कमी करणे, वीज दरवाढ आटोक्यात ठेवणे, तंत्रज्ञानाचा वापर करून वीजगळती कमी करणे व नुकसान रोखणे अशी अनेक महत्त्वाची कामे केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ऊर्जामंत्री रायगड जिल्ह्यातील होते पण त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात मुंबईजवळच्या एलिफंटा बेटावर वीज पोहचवता आली नव्हती. स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनी प्रथमच या बेटांवर विजपुरवठा करण्याची कामगिरी भाजपा सरकारने करून दाखवली. सरकारची ही कामगिरी सहन होत नसल्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी आरोप केले.

Previous articleदसरा मेळाव्यात शक्तीप्रदर्शनासाठी पंकजा मुंडेंचे समर्थक सरसावले
Next articleभाजपच्या ४५ आमदारांना तर ६ खासदारांना येत्या निवडणूकीत धक्का बसणार !