गिते स्व. बाळासाहेबांचा नाही तर मोंदीचा जप करुन निवडून आलेत

गिते स्व. बाळासाहेबांचा नाही तर मोंदीचा जप करुन निवडून आलेत

सुनिल तटकरे यांची टीका

पेण : २०१४ साली जिल्ह्यातील युवकांना दरवर्षी २० कोटी युवकांना रोजगार मिळवून देण्याचे स्वप्न दाखवुन या सरकारने युवकांचा हिरमोड केला आहे. रायगड जिल्ह्याचे खासदार तर केंद्रात मंत्री असुनही अनंत गितेंना जिल्ह्यासाठी एक नवा कारखाना सुरु करता आला नाही. अशा निष्क्रीय खासदाराला पराभूत करुन घरी बसवण्याचे आवाहन माजी मंत्री सुनिल तटकरे यांनी केले आहे. ते पेण येथे आयोजित राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्या कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी बोलत होते.

आघाडी सरकारच्या वेळेस तत्कालीन अवजड उद्योग मंत्री स्व.विलासराव देशमुख यांनी तसेच खा.प्रफुल्ल पटेल यांनी स्वत:च्या मतदारसंघात हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प उभारुन युवकांना रोजगार मिळवुन दिला. परंतू विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी रायगड जिल्ह्यात मागील साडेचार वर्षात काहीच केले नाही. अनंत गिते हे शिवसेनेचे नेते असले तरी २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी स्व. बाळासाहेबांचे नाव सुद्धा घेतले नाही. केवळ मोदी नावाचा जप करुन त्यांनी लाटेचा फायदा करुन घेतला. त्यांच्यात लोकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद नसुन निष्क्रीय खासदार म्हणुनच त्यांची ओळख असल्याची टिका  तटकरे यांनी केली.

सेना-भाजप सरकारच्या कार्यकाळात महागाईने उच्चांक गाठला असून पेट्रोल-डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहे. हि दरवाढ लवकरच शंभरी पार करेल अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्म समभावाची शिकवण दिली. परंतू या सरकारला जातीयभेद करुन समाजासमाजात दुफळी निर्माण करायची आहे. राज्यात तसेच देशात सुद्धा कॉग्रेस आणि इतर समविचारी पक्षांना सोबत घेवुन लढा द्यायचा असुन कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे तटकरे यांनी सांगितले.

Previous articleभाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे उद्या परळीत प्रशिक्षण शिबीर
Next articleधनगर आरक्षणासाठी टीस च्या अहवालाची गरजच काय ? धनंजय मुंडे