म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंतांच्या प्रयत्नांमुळे रहिवाशांना मिळाले थकीत भाडे

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंतांच्या प्रयत्नांमुळे रहिवाशांना मिळाले थकीत भाडे

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) अध्यक्ष उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे वडाळा पश्चिम येथील हनुमान चाळ या उपकरप्राप्त इमारतीतील १६ रहिवाशांना संबंधित विकासकाने गेल्या तीन महिन्यांपासून थकविलेले घरभाडे मिळाले.

म्हाडा मुख्यालयात  अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते या इमारतीतील १६ रहिवाशांना थकीत घरभाड्याचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. २००८ मध्ये सदरहू उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाला प्रारंभ झाला. गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित विकासकामार्फत रहिवाशांना घरभाडे दिले गेले नव्हते. या प्रकरणी आठवडाभरापूर्वी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांची सदरहू इमारतीतील रहिवाशांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन आपली व्यथा मांडली. अध्यक्ष उदय सामंत यांनी तातडीने रहिवाशांच्या तक्रारीची दखल घेत विकासकाला रहिवाशांचे थकीत भाडे देण्याचे आदेश दिले. म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांच्या आदेशानंतर अवघ्या आठच दिवसात विकासकाने सहापैकी तीन महिन्याचे थकीत भाडे  दिले. उर्वरित तीन महिन्याचे भाडे लवकरच देण्याचे आश्वासन संबंधित विकासकाने सामंत यांना दिले.

थकीत भाडे मिळाल्याबद्दल रहिवाशांनी समाधान व आनंद व्यक्त करीत म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांचे आभार मानले. संबंधित विकासकाने उर्वरित थकीत भाडेही लवकर द्यावे व सदरहू इमारतीचा लवकरात लवकर पुनर्विकास करावा, असे आदेश सामंत यांनी दिले. यावेळी वसंतराव जाधव, हेमा हरनोळ आदींसह रहिवाशी उपस्थित होते.

Previous articleदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ जिंकायच्या दृष्टीने कामाला लागा : आठवले
Next articleशिवसेनेने गरळ ओकण्यापेक्षा राजीनामे देऊन ताठ कणा दाखवावा