शरद पवार – भास्कर जाधव यांच्यात गुफ्तगु

शरद पवार – भास्कर जाधव यांच्यात गुफ्तगु

चिपळूण : राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून रायगड लोकसभा संघातून माजी मंत्री सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यात जमा आहे. पण जिल्ह्यातील दुसरे दिग्गज नेते भास्कर जाधव यांनी आपणही निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सूचित केल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पवार चिपळुणात एका कार्यक्रमासाठी आले असताना मुद्दाम वाकडी वाट करुन जाधव यांच्या निवासस्थानी गेले. पन्नास मिनिटे त्यांनी जाधव यांच्याशी बंद दाराआड चर्चा करुन जाधव यांची समजूत काढल्याची चर्चा आहे.

रायगड लोकसभा उमेदवारी जाहीर झालीच असे समजून तटकरे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पण भास्कर जाधव यांनीही उत्सुकता दाखवल्याने तटकरे यांची पंचाईत झाली. राष्ट्रवादीला या परिस्थितीत कोणताही पेच परवडणारा नसल्याने खुद्द पवार काल जाधव यांच्या निवासस्थानी गेले. जाधव यांची त्यांनी समजूत काढल्याचे बोलले जाते. मात्र नेमकी काय चर्चा झाली, ते बाहेर आलेच नाही. यावेळी तटकरेही होते. पण त्यांना गुप्त भेटीत प्रवेश नव्हता. अखेर त्यांना आत बोलवण्यात आले. नंतर काही मिनिटे तिघांत चर्चा झाली.

तटकरे की जाधव यापैकी कुणाला उमेदवारी मिळणार, याची प्रचंड उत्सुकता रायगडात आहे. परंतु निवडून येण्याची क्षमता हा निकष लावला तर तटकरे हे जास्त वजनदार नेते आहेत, असेही बोलले जाते.

Previous articleशिवसेनेने गरळ ओकण्यापेक्षा राजीनामे देऊन ताठ कणा दाखवावा
Next articleदुष्काळग्रस्तांची सरकारने केली चेष्टा :अशोक चव्हाण