दुष्काळग्रस्तांची सरकारने केली चेष्टा :अशोक चव्हाण
माजलगाव : राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शनिवारी सायंकाळी तालुक्यातील नित्रुड येथे मोबाईल टॉर्चच्या उजेडात पिकांची पाहणी केल्याप्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे. ही पाहणी म्हणजे सरकारने दुष्काळग्रस्तांची केलेली चेष्टा आहे, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला. सरकार फक्त पाहणीची औपचारिकता पूर्ण करत आहे. सरकारला दुष्काळग्रस्तांच्या समस्याशी काहीही घेणेदेणे नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली.
परवा निलंगेकर यांचा दुष्काळ पाहणी दौरा होता. पण त्यांना नित्रुड येथे पोहचण्यास चार तास उशिर झाला. तेव्हा पूर्ण अंधार पडला होता. काहीच दिसत नसल्याने मोबाईल टॉर्चच्या उजेडात पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा निलंगेकरांसमोर मांडल्या. मात्र मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात दुष्काळाची पाहणी करण्याच्या या प्रकारावर विरोधकांनी लगेचच हल्ला चढवला.या पाहणीतून काही तरी हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पण मंत्री दुष्काळाची पाहणी करत आहेत की उमेदवारांचा शोध घेत आहेत, असा खोचक सवाल चव्हाण यांनी केला.