भाजप सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी गावागावात पोहचवणार

भाजप सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी गावागावात पोहचवणार

मुंबई :  भाजप सरकारला येत्या ३१ ऑक्टेंबरला चार वर्षे पूर्ण होत असल्याने भाजपच्यावतीने विकास यात्रेचे आयोजन करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकार गेल्या चार वर्षात कसे अपयशी ठरले आहे हे सांगण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने येत्या १ नोव्हेंबरपासून राज्यातील प्रत्येक गावात  घोंगडी बैठका घेवून सरकारच्या अपयशाच्या गाथा पुस्तकाच्या रुपात जनतेपर्यंत पोचवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

येत्या ३१ ऑक्टोबरला राज्यातील युती  सरकारला चार वर्ष पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आज पत्रकार परिषद घेवून “ ही कसली प्रगती ही तर अधोगती असुरक्षित,अर्थशून्य,अशांत,असहाय्य महाराष्ट्र” नावाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. या पुस्तिकेमध्ये अपयशी सरकारची चार वर्ष यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.या पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. सरकारने जनतेला कसे फसवले आहे.राज्यात कशा पध्दतीने फसव्या योजना आणि योजनांचे कसे फसवे बुडबुडे काढले आहेत ते मांडले. छत्रपती शिवाजी महाराज का आर्शिवाद,चलो चले मोदी के साथ असा नारा देत भाजप सत्तेत आले. सत्तेत येताना राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले. विरोधी पक्ष शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी करत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्जमाफी हा उपाय नाही असे सांगत होते. मात्र कर्जमाफी जाहीर करताना त्यांनी आकडयाचा खेळ केला. आघाडी सरकारच्या काळात ८ हजार ७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या परंतु या चार वर्षात १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांनी संप पुकारल्यानंतर सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली. परंतु आजपर्यंत १६ हजार कोटींचे कर्जवाटप झाले आहे. जर ३४ हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तर इतर पैसे गेले कुठे असा सवालही  मलिक यांनी केला.

राज्यातील अजुनही ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. सरकारने कर्जमाफीचे आकडे मोठे दाखवले. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार म्हणणाऱ्या सरकारने फक्त फसवी कर्जमाफी करुन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढवला असल्याची टीका मलिक यांनी केली. सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव जाहीर झाला तरी हमीभावाप्रमाणे आजही सौदे होत नसल्याचे चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. हमीभावाबाबत ठोस असे सरकार शेतकऱ्यांना सांगायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दयायचा असेल तर सरकारने स्वत:चे खरेदी केंद्र उभारावे अशी मागणी  मलिक यांनी केली.

राज्यात राबवण्यात आलेली जलयुक्त शिवार योजना ही जलयुक्त झाली की जलमुक्त झाली आहे. ही योजना भाजप कार्यकर्त्यांचे पोट भरण्यासाठी सुरु करण्यात आल्याचा आरोपही मलिक यांनी केला.कर्जमाफी,हमीभाव,सिंचन आदींसह सर्वच क्षेत्रात राज्यातील जनतेला दिलासा देण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून ७० हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे आणि २ लाख तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्याचे सांगत आहेत . त्यांनी २ हजार तरी नोकऱ्या दिलेल्यांची नावे जाहीर करावीत असे आव्हान मलिक यांनी यावेळी दिले.राज्यातील अस्तित्वात असलेले कारखाने बंद होत आहेत. नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत.भाजपच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी सुरु आहे. राज्याचे कामगारमंत्री निलंगेकरांच्या माध्यमातून कारखानदारांकडून खंडणी घेण्याचे काम सुरु आहे. माथाडी कामगार निर्माण करुन राज्यात गुंडगिरी सुरु असून त्यामुळे राज्यात कारखाने आणि उदयोगधंदे यायला तयार नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

आघाडी सरकारच्या काळात स्वस्त धान्य दिले जात होते त्या लाभार्थ्यांची यादीच सरकारने रद्द केली आहे. गॅस सिलेंडरचे दर वाढले तरी रास्त धान्य दुकानावर रॉकेल दिले जात नाही. रास्त धान्य दुकानावर बायोमॅट्रीक पध्दत सरकारने आणलीपरंतु ग्रामीण लोकांना हे शक्य होत नसल्याने त्यांना धान्य मिळणं कठीण झाले आहे त्याचा गैरफायदा धान्यदुकानदार घेत ब्लॅकने धान्य विकत असल्याचा आरोपही  मलिक यांनी केला.राज्यातला क्राईम रेट भयानक आहे. जीवघेणे हल्ले, हत्या, बलात्कार वाढले आहेत. महाराष्ट्रात ३६ हजार महिला मुंबईमध्ये बेपत्ता आहेत त्यांचा शोध लागत नाही.ही कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा सवाल  मलिक यांनी केला.एकंदरीत आज घडीला महाराष्ट्र असुरक्षित आणि अशांत,असहाय्य झालेला आहे.आम्ही सत्तेत होतो त्यावेळी हे सरकार बोंबाबोंब करत होते की, अडीच लाख कोटीचे कर्ज केले आहे परंतु चार वर्षात पाच लाख कोटीचा कर्जाचा डोंगर कसा झाला आहे. राज्यसरकार दिवाळखोरीत गेले तरी चालेल परंतु आपली हप्तेखोरी कशी वाढेल हा धंदा सुरु केला असल्याचा आरोपही  मलिक यांनी केला.मुंबईतील धारावी परदेशी कंपनीला विकत देण्याचा डाव भाजपाचा आहे. दुबईच्या एका व्यापाऱ्याच्या हातात ६०० एकर जमीन देण्याचा कार्यक्रम सरकारचा सुरु असल्याचेही नवाब म्हणाले.

विकासाच्या नावावर कर्जाचा डोंगर,ब्लॅकलिस्टमधील ठेकेदाराला ठेका देत ४ वर्षात महाराष्ट्राला लुटले आहे.बेकार केले आहे.या चार वर्षात सरकारला विकास करता आलेला नाही. आत्ता विकास यात्रेच्या नावावर भाजप पैसे देवून प्रचार करेल परंतु आम्ही कार्यकर्त्यांना घेवून सरकारचे अपयश जनतेसमोर आणणार असून त्याविरोधात राज्यभर आंदोलन केले जाणार असल्याचेही  मलिक यांनी सांगितले.

Previous articleमोदी सरकारचा कारभार म्हणजे आम्ही करू तीच पूर्व दिशा : शरद पवार
Next articleमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन