मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सर्वांत मोठ्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
मुंबई : राज्यातील आत्तापर्यंतची सर्वांत मोठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा असलेल्या ‘सीएम चषकाचे’ उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या १ नोव्हेंबर रोजी होणार असून, १२ जानेवारी पर्यंत चालणा-या या स्पर्धेत राज्यातील एकूण ५० लाख स्पर्धक सहभागी होतील. पुण्यातील हडपसर येथील लक्ष्मी लॉन येथिल अटल खेल नगरीत या स्पर्धांची जय्यत तयारी सुरू आहे.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील क्रीडा जगतातील विशेष व्यक्ती, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू,युवा खेळाडू, पुण्यातील विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी- विद्यार्थिनी या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पुण्यात होणा-या उद्घाटन समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांसह प्रदेश भाजप अध्यक्ष रावसाहेब दानवे, क्रीडा मंत्री विनोद तावडे, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपा युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन, युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, पक्षाचे खासदार, आमदार, भाजपा नेते उपस्थित राहणार आहेत. सुमारे अडीच महिने चालणा-या ‘सीएम चषकामध्ये’ एकूण ५० लाखांपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था, स्पोर्टस क्लब व युवा मंडळे यामध्ये सक्रिय सहभागी होतील. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सीएम चषकामध्ये’ भाग घेण्यासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रत्येक जिल्हामध्ये नोंदणी सुरू आहे.