तुम्हाला न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

तुम्हाला न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही : धनंजय मुंडे

मुंबई : एमपीएससी मार्फत परिवहन खात्यात सहाय्यक वाहतुक मोटार निरीक्षक पदाच्या परिक्षेत पास होऊनही नियुक्ती रद्द झाल्याने मुंबईच्या आझाद मैदान परिसरात आंदोलन करणार्‍या त्या ८३२ उमेदवारांची आज विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सायंकाळी आझाद मैदानाच्या बाहेर भेट घेत त्यांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दिला. मुंडेंच्या आश्‍वासनानंतरच या उमेदवारांनी आंदोलन स्थळ सोडले.

दोन वर्षांपूर्वी सरकारने एक जाहिरात काढून परिवहन खात्यात एमपीएससी मार्फत सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षक पदाच्या उमेदवारांची भरती केली होती, त्यात हे ८३२ उमेदवार पात्र झाले, मात्र या नियुक्तीविरूध्द नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्याने सदर नियुक्त्या रद्द झाल्या. न्यायालयात सरकारने योग्य बाजु न मांडल्यानेच आपल्यावर अन्याय झाल्याची भावना या उमेदवारांनी आंदोलन सुरू केले होते.

१५ दिवसांपूर्वीच धनंजय मुंडे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नागपूर खंडपीठाच्या या निर्णयाविरूध्द अपिल करावे व या उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती. आज त्यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमातही परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे जाहीर व्यासपीठावरून ही मागणी लावून धरली. त्यावर रावते यांनी सरकार न्यायालयात अपिल करून उमेदवारांना न्याय मिळवून देईल असे आश्‍वासनही दिले.

मात्र सदर उमेदवारांनी मुंडे यांची भेट झाल्याशिवाय आंदोलन मागे घ्यायचे नाही, असा पवित्रा घेतला. सायंकाळी या उमेदवारांना पोलिसांनी आझाद मैदानाच्या बाहेर काढल्यानंतरही हे उमेदवार धनंजय मुंडे यांची प्रतिक्षा करत गेट बाहेरच थांबुन होते, अखेर सायंकाळी ८ वाजता मुंडे यांनी या उमेदवारांची भेट घेऊन त्यांना संपुर्ण विषय समजावून सांगितला. या प्रकरणी आपण तुम्हाला न्याय मिळे पर्यंत स्वस्थ बसणार नाही, सरकार कोर्टात काहीही बाजु मांडो, तुम्हीही न्यायालयात जा त्यासाठीची आवश्यक ती सर्व मदत मी स्वतः करेल आणि सरकारलाही करायला भाग पाडेल असा शब्द दिला. त्यानंतरच या उमेदवारांनी आंदोलन स्थळ सोडले.

Previous articleपंकजा मुंडे यांच्या अमेरिका दौ-याविषयी विरोधकांचा पोटशूळ : भाजप
Next articleफडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल!