पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली बचतगटांच्या महिलांची फेसबुक, टीआयई संस्थेला भेट

पंकजाताई मुंडेंच्या नेतृत्वाखाली बचतगटांच्या महिलांची फेसबुक, टीआयई संस्थेला भेट

राज्यातील बचतगट होणार आता ‘हायटेक’

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांचा अमेरिका दौ-याचा पहिला दिवस सर्वार्थाने सार्थकी ठरला. सॅन फ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालय, व्हाट्स अॅप प्रतिनिधी व टीआयई संस्थेला त्यांनी  भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याचे आवाहन त्यांनी केले .

फेसबुक आणि व्हॅाटस अॅप  दोन्हीही समाज माध्यमांना,  त्यांच्याकडील तंत्रज्ञान भारतातील आणि राज्यातील महिलांना देऊन त्यांना त्यांच्यातील कौशल्यांना जगासमोर मांडण्यासाठी महाराष्ट्र सरकार बरोबर काम करण्याचे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी यावेळी केले. येथील अद्ययावत माहिती घेवून ग्रामीण भागातील बचतगट हायटेक झाल्याशिवाय राहणार नाहीत असे त्या म्हणाल्या. राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुक आणि व्हॅाटस अॅप यांनी एकत्र काम करणार आहेत. दोन्ही समाज माध्यमांचे प्रतिनिधी डिसेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार असून दोघांनीही ही भागीदारी पुढे नेण्यासाठी बैठकीत सहमती दर्शविली. याप्रसंगी  फेसबुकच्या प्रतिनिधी मीरा पटेल, आरती सोमण, ब्रेंडा आणि कोलिन,  व्हॅाट्सअप प्रतिनिधी बेन्सापल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता,  उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद  आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.

महाराष्ट्रातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता तीन वर्षासाठी संयुक्त भागीदारी करण्याबाबत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी सोमवारी सिलीकॅान वेलीतील टीआयई  संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली.टीईआयच्या मदतीने महाराष्ट्रातील महिला व  युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता संयुक्त भागीदारी  करण्याबाबत ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या प्रतिनिधी समवेत चर्चा केली. राज्यात उमेद आणि माविमच्या माध्यमातून तसेच दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या रोजगार निर्मितीच्या कामाची त्यांनी माहिती दिली. यावेळी सचिव, असीमकुमार गुप्ता आणि उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी राज्यातील वस्तुस्थितीचे सादरीकरण केले. बचत गट प्रतिनिधी राजश्री राडे, विमल जाधव,  संगीता गायकवाड यांनी त्यांचा गांव ते अमेरिका हा जीवन प्रवास कथन केला. त्यांच्या कार्याचे सर्वांनी खूप कौतुक केले. टीआयई  चे संस्थापक अध्यक्ष सुहास पाटील यांनी संस्थेच्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी टीआयई चे कार्यकारी संचालक विजय मेनन, जय विश्वनाथन, विश मिश्रा, राजू रेड्डी, करपगन नारायणन, अनु जगदीश , मतिन सय्यद, करूणाकरण,  अजय पटवर्धन आणि फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद उपस्थित होते. यावेळी टायच्या प्रतिनिधींना नोव्हेंबर महिन्यात  राज्यात येण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.

ग्रामीण बचतगटांच्या महिलांनी या दौ-यात तर कमालच केली. बचतगटांनी तयार केलेल्या भारतीय वस्तू त्यांनी अमेरिकन लोकांना  सॅम्पल (नमुना) म्हणून दाखवल्या पण उपस्थित प्रतिनिधींना त्या वस्तू एवढ्या आवडल्या की त्यांनी तिथेच त्या खरेदी केल्या. तांब्याच्या एका बॅाटलला २१०० रू. तर वारली पेंटींगला तब्बल ७२१० रूपये महिलांना मिळाले. बघता बघता   पंधरा मिनिटात सुमारे ३५ हजार ७०० रूपयांची विक्री यावेळी झाली.

 

Previous articleफडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल!
Next articleतर एसटीचे कर्मचारी सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाहीत : मुंडे