शिवसेनेकडे युतीचा आग्रह म्हणजे मित्रत्व : दानवे
अमरावती : आगामी निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आहे. तसा ठरावही सेनेने मंजूर केला आहे. भाजपने मात्र सातत्याने युतीचा आग्रह धरला आहे. मात्र ही भाजपची लाचारी नाहीतर मित्रत्व आहे, असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
शिवसेना सतत स्वबळावर लढण्याची भाषा करत आहे. सामना मधून रोज भाजपवर जहरी टीका केली जाते. तरीही मुख्यमंत्री आणि इतर भाजप नेते युतीचा आग्रह धरत आहेत. ही लाचारी नाही का, असे विचारल्यावर दानवे यांनी हे मित्रत्व आहे, असे उत्तर दिले. ते म्हणाले की, येणारी लोकसभा निवडणूक शिवसेनेसोबत युती करुन लढण्याची भाजपची इच्छा आहे. २०१४ चा अपवाद सोडला तर सर्वच निवडणुका आम्ही एकत्र लढवल्या. त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टळले. याही वेळा आमची हीच तयारी आहे. आम्ही भाजप सर्व ठिकाणी मजबूत केला आहे. शिवसेना मतदारसंघातही भाजप मजबूत आहे. त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल, असेही दानवे यांनी सांगितले.
भाजपने २०१४ च्या निवडणुका लाटेत जिंकलेल्या नाहीत, हे नंतरच्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये स्पष्ट झाल्याचा दावाही त्यांनी केला.राममंदिराच्या मुद्यावर दानवे यांनी म्हटले की, मंदिराचा मुद्दा आम्ही सोडलेला नाही. पण पुढील निवडणुका या विकासाच्या मुद्यावरच लढवल्या जातील.मंत्रिमंडळ विस्तार नक्की होणार आहे. पण तारीख ठरलेली नाही, असे दानवे यांनी सांगितले.