बेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे : पंकजा मुंडे

बेघरांना मिळणार परवडणाऱ्या किंमतीत घरे : पंकजा मुंडे

मुंबई : बचतगटांच्या महिलांमधील उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या अमेरीका दौऱ्यावर असलेल्या समुहाने आज जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमसह अमेरीकेतील विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन महाराष्ट्रातील ग्रामविकासाची चळवळही कशी बळकट करता येईल याबाबत विविध मान्यवरांशी चर्चा आणि आदान प्रदान केले.

“सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी तसेच राज्यातील बेघरांना परवडणाऱ्या किंमतीत घरे उपलब्ध करून देण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथे जागतिक दर्जाच्या वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा केली. यावेळी त्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून परवडणाऱ्या किंमतीत घरे बांधण्याबाबत चर्चा झाली.

येत्या दोन महिन्यात भारतात येऊन तंत्रज्ञान देवाण – घेवाणीबाबत काम करण्याचे वेगा बिल्डींग सिस्टीमच्या प्रतिनिधींनी मान्य केले. यावेळी वेगा बिल्डींग सिस्टिम कंपनीचे चेअरमन डेव्हिड कोहेन, मुख्य कार्यकारी अधिकारी केन होलेन, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आदी मान्यवर उपस्थित होते.

समुहाने आज अमेरीकेतील नामवंत अशा स्टॅनफर्ड विद्यापीठालाही भेट दिली. राज्यातील गावे आदर्श करण्यासाठी योगदान देण्याबाबत यावेळी डॉ. कलवजीत सिंग आनंद आणि संमिना कॉर्पोरेशनचे डॉ. सुंदर कामत यांच्यासमवेत चर्चा झाली. डॉ. सनी आनंद आणि डॉ. कामत यांनी यावेळी आदर्श गाव निर्माणबद्दल कामाची माहिती सादर केली. अंजनी कोचर यांच्याबरोबर राज्यातील महिला बचतगटांच्या प्रगतीचा अभ्यास करून महाराष्ट्र  शासनाला अहवाल सादर करण्याबाबत चर्चा झाली.

साई ग्लोबल मिशनमार्फत उर्जा, शिक्षण, आरोग्यसेवा, स्वच्छ पाणी, स्वच्छता आणि सामाजिक उद्योजकता यांचा समावेश असणारे आणि त्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सहयोगी व्यासपीठांच्या माध्यमातून त्यांची टीम  ग्रामीण समुदायांचा विकास करत आहे. त्यांच्या अनुभवांचा आणि तंत्रज्ञानाचा राज्याला खूप उपयोग होईल. त्यांच्या प्रतिनिधींना  नोव्हेबर-डिसेंबर मध्ये राज्यात येण्याचे निमंत्रण देण्यात आले. उमेद अभियानाच्या डिल्लन कोहेन, नाव्या कोंडा आणि वीर शहा या तीन युवकांना येथे अभ्यासासाठी पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यानी देखील चर्चेत सहभाग घेतला.

Previous articleआगामी निवडणूकीत शिवसेनेबरोबर युती होणार : मुख्यमंत्री
Next articleसरकारला घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे :अजित पवार