पंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

पंकजा मुंडेंच्या हस्ते न्यूयॉर्क मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण

मुंबई : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री  पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज न्यूयॉर्क शहरात भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे थाटात अनावरण झाले. यावेळी उपस्थित भारतीय व्यापा-यांनी ग्रामीण बचतगटांच्या उत्पादनांना अमेरिकेत हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याची हमी पंकजा मुंडे यांना दिली.

न्यूयॉर्क शहरात गुजराथी समाज बांधव मोठ्या संख्येने आहे, याठिकाणी गुजराथी व्यापारी संघाच्या वतीने  पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्यापारी संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण  पंकजा मुंडे यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. यावेळी बोलतांना त्यांनी अखंड हिंदुस्थान निर्माण करून भारतात एकता प्रस्थापित करणा-या वल्लभभाई पटेल यांचा भारतातील स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच असा पुतळा संपूर्ण जगाला एकतेची प्रेरणा देत राहील, असे गौरवोद्गार काढले.

महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या उमेद अभियानाची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी सर्व न्यूयॉर्कस्थित व्यापारी वर्गाने बचत गटांची उत्पादने अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्याची हमी दिली. गुजराती समाज संघटनेचे अध्यक्ष मनीष पटेल, न्यूयॉर्क मधील भारताचे वाणिज्य राजदूत चक्रवर्ती, उमेद्च्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे प्रतिनिधी रुबाब सूद आदी उपस्थित होते.

Previous articleधुळे व अहमदनगर महानगरपालिकेसाठी ९ डिसेंबरला मतदान
Next articleराज ठाकरे पुन्हा नाशिककरांना घालणार साद