राज ठाकरे पुन्हा नाशिककरांना घालणार साद
नाशिक: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा प्रमुख जनाधार नाशिक राहिला आहे. नाशिक महापालिकेत त्यांना सत्ताही मिळाली होती. पण गेल्या निवडणुकीत राज यांना नाशिककरांनी दूर सारले.आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी नाशिककरांना साद घालण्याचे ठरवले आहे. दिवाळीनंतर राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार असून राजकीय आतषबाजी करण्याची शक्यता आहे.
तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता यासह राज ठाकरेंच्या पारड्यात नाशिककरांनी भरभरून सत्ता टाकली होती. पण राज ठाकरे त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करु शकले नाहीत. नाशिकला तर राज फिरकतही नव्हते, अशी चर्चा होती. खुद्द नाशिक मनसेत आता जुने निष्ठावंत उरले नाहीत. गेल्या निवडणुकीत मतदारांनी राज यांना ठेंगाच दाखवला. आता पुन्हा नाशिककरांना आपल्याकडे वळवण्याच्या हेतूने राज यांचा नाशिक दौरा होत आहे. त्यांच्या या दौऱ्याच्या बातमीने मरगळलेल्या मनसेत चैतन्याची लाट आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेऊनही विकास झालाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भाजपविरोधात नाराजी आहे. त्याशिवाय नोटबंदी, जीएसटी यामुळे सार्वत्रिक नाराजी आहे. याचा फायदा घेऊन पुन्हा मतदारांना आपल्याकडे आणता येईल, ही खात्री राज यांना आहे. यामुळेच त्यांचा हा दौरा होत आहे.नाशिक आणि राज यांचे नाते फार जुने आहे. शिवसेनेत असतानाही राज यांनीच नाशिकमध्ये शिवसेनेची पक्की बांधणी केली होती. मनसे स्थापन केल्यावरही नाशिककरांनी मनसेच्या पारड्यात सत्तेचे माप घातले होते.
शेवटच्या काही महिन्यात राज यांनी काही चांगली कामेही केली. पण त्यांचे ब्रॅंडिंग नीट केले गेले नाही. त्यामुळे नाराज नाशिककरांनी भाजपला साथ दिली. आता राज नाशिककरांची नाराजी दूर करु शकतात का, याची उत्सुकता आहे. दौऱ्यात राज ठाकरे काय बोलणार, याचीही उत्सुकता आहे. ते मुख्यमंत्री आणि मोदी सरकारला लक्ष्य करणार हे निश्चित आहे.