राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करु :रा. स्व. संघाचा इशारा

राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करु :रा. स्व. संघाचा इशारा

ठाणे : राम मंदिर व्हावे ही भारतीयांची इच्छा आहे. न्यायालयानेही हिंदूंच्या भावनांचा आदर करावा. केंद्र सरकारने मंदिरासाठी लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अन्यथा राम मंदिरासाठी १९९२ सारखं आंदोलन करायची आमची तयारी आहे, असा निर्वाणीचा इशारा भाजपची पितृसंस्था संघाने आज दिला. यामुळे भाजप सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.
संघाच्या तीन दिवसीय शिबिराची आज सांगता झाली. त्यावेळी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारला हा इशारा दिला. मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी सरकारवर दबाव वाढवला असतानाच संघानेही कडक इशारा दिल्याने भाजप सरकारची मोठीच पंचाईत झाली आहे.

जोशी म्हणाले की, राम मंदिरासाठी वेळ लागतोय, हे वेदनादायी आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. ते न्यायालय न्याय देईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.गेल्या ३० वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. लोकांच्या इच्छेनुसार मंदिर झालं पाहिजे. न्यायालय लोकभावनेचा आदर करुन निर्णय देईल. तरीही गरज पडल्यास १९९२ सारखं आंदोलन करु, असं जोशी यांनी स्पष्ट केलं.
राम मंदिर प्रकरणी कधी न्याय द्याल, असं आम्ही विचारलं असता आमचं प्राधान्य वेगळंच आहे, असं म्हणून न्यायालयानं हिंदूंच्या भावनांचा अपमान केल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, संघानं अशी निर्वाणीची भूमिका घेण्यामागे शिवसेनेची भूमिका असल्याचं बोललं जातं. शिवसेनेने निवडणुकांमध्ये राम मंदिर कळीचा मुद्दा बनवण्चाचं ठरवलं आहे. भाजपचा मुद्दा सेनेनं हायजॅक केला. त्यामुळे संघाला भाजपला इशारा देण्याची वेळ आली असल्याचं बोललं जात आहे. भाजपची मात्र यामुळे कोंडी झाली आहे.

Previous articleसरकार दुष्काळ जाहीर करण्याची तारीख विसरले का?
Next articleदुष्काळावर सरकारने फक्त शब्दांचा खेळ केला :उद्घव ठाकरे