अवनी वाघिणीच्या मृत्यूची चौकशी करणार : मुख्यमंत्री
मुंबई:अवनी वाघिणीला ठार करण्याच्या प्रकरणाला आता राजकीय रंग आला आहे. केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केल्यावर आणि शिवसेनेनेही सामना मधून हल्लाबोल केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली.
वाघिणीला गोळ्या घालून ठार करावे लागणे ही दुर्दैवी घटना आहे. पण यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याची चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.पांढरकवडा येथे अवनी वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न फसल्यावर तिला गोळी घालून ठार करण्यात आले. हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे.
मनेका गांधी यानी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. अनेकांनी विनंती करुनही मुनगंटीवारांनी अवनीला ठार मारण्याचे आदेश दिले, असे त्या म्हणाल्या.यावर मुख्यमंत्री म्हणाले की, मनेका गांधी यांचे प्राणी प्रेम आम्हाला माहीत आहे. त्यांनी कठोर भाषेत केलेली टीका आम्ही समजू शकतो. वाघिणीला ठार मारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी केली जाईल.