या सरकारला सत्तेचा माज आलाय : राज ठाकरे
मुंबई:अवनी वाघिणीच्या वादग्रस्त मृत्युनंतर राज्यात सुरु झालेल्या राजकीय आतषबाजीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही आज उडी घेतली आहे. अवनी वाघिणीला मारण्याची गरज नव्हती. तिला बेशुद्घ करता आले असते. पण या सरकारला सत्तेचा माज आलाय, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी केली.
राज ठाकरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुनगंटीवार बेफिकीरपणे उत्तरे देत आहे. त्यांचे मंत्रिपद जाऊ शकते, असे राज यांनी म्हटले आहे. घोडे मैदानाजवळ आलेय, या शब्दांत राज यांनी निवडणुकीत सरकारला उत्तर दिलै जाईल, असे सुचवले आहे.
अंबानींचा प्रकल्प वाचवण्यासाठी अवनीची हत्या राज ठाकरे यांनी सरकारवर गंभीर आरोप केला. अनिल अंबानी यांचा प्रकल्प वाचवण्यासाठी अवनी वाघिणीला ठार करण्यात आल्याचे ते म्हणाले. वाघाचे पुतळे उभे करुन वाघ वाचवता येत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेनेने यापूर्वीच राज्य सरकारला अवनी प्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनीही सरकारवर या निमित्ताने निशाणा साधला असल्याने वनमंत्री मुनगंटीवारांना उत्तरे देणे कठीण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस मात्र मुनगंटीवारांच्या पाठिशी असल्याचे चित्र समोर आले आहे.